सिंधुदुर्ग

Sindhudurg Drug Cultivation Probe | आ. राणेंच्या आरोपानंतर पोलिस ॲक्शन मोडवर

दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : रबर प्लांटेशनच्या आड गांजाची लागवड सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आ. नीलेश राणे यांनी केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाल्याचे चित्र आहे. विशेषतः दोडामार्ग तालुक्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर हालचाली वाढवल्या असून विविध भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. अनेक वर्षांपासून अवैध धंद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळख निर्माण झालेल्या काही भागांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध दारू व्यवसाय, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असताना पोलिस प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप वारंवार होत होते. मात्र आ. नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांवर निशाणा साधला आणि पोलिस प्रशासनावर कोट्यवधी रुपयांच्या हप्तेखोरीचे गंभीर आरोप केल्यानंतर हा विषय राज्यभर चर्चेचा बनला.

आ. राणे यांनी केवळ अवैध धंद्यांचा मुद्दाच उपस्थित केला नाही, तर दोडामार्ग तालुक्यातील काही रबर प्लांटेशनच्या आड गांजाची लागवड सुरू असल्याचा दावा करत गौप्यस्फोट केला. या आरोपांनंतर पोलीस यंत्रणेवर चौफेर दबाव निर्माण झाला असून त्याचे पडसाद आता प्रत्यक्ष कारवाईच्या स्वरूपात उमटू लागल्याची चर्चा आहे. तालुक्यातील विविध रबर प्लांटेशन परिसरात पाहणी, माहिती संकलन, चौकशी आणि तपासणी मोहिमा सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

गोवा सीमेलगत असलेला दोडामार्ग तालुका भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. दाट जंगल, डोंगराळ भाग आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांमुळे अनेकदा बेकायदेशीर हालचालींसाठी हा परिसर वापरला जात असल्याच्या चर्चा यापूर्वीही आहेत. त्यामुळे रबर लागवडीच्या आड काही गैरप्रकार सुरू असल्याच्या आरोपांनी आता अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. दरम्यान, पोलिसांनी तालुक्यात वाढविलेल्या हालचालींमुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून गुप्त माहितीच्या आधारेही पडताळणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात काही धक्कादायक खुलासे किंवा मोठ्या कारवाया समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ राजकीय व्यासपीठांवर आणि जनतेच्या चर्चेत असलेले मुद्दे आता प्रत्यक्ष तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. आ. राणे यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? रबर प्लांटेशनच्या आड खरोखरच काही गैरप्रकार सुरू आहेत का? आणि जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचणार का? याकडे संपूर्ण सिंधुदुर्गचे लक्ष लागून राहिले आहे.

मोहीम दिखाऊ तर ठरणार नाही ना !

दोडामार्गात सुरू झालेली ही मोहीम केवळ दिखाऊ ठरणार की अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालणारी निर्णायक कारवाई ठरणार? याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे कि आ. राणेंच्या आरोपांनंतर दोडामार्गातील अवैध धंदे आणि रबर प्लांटेशनचा मुद्दा आता जिल्ह्याच्या राजकीय आणि प्रशासकीय केंद्रस्थानी पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT