दोडामार्ग : माटणे-वरचीवाडी येथे दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत श्रीकांत धानू गवस यांचे अज्ञात चोरट्यांनी शनिवारी सकाळी 9 वा.च्या सुमारास घर फोडून सुमारे दीड लाखाच्या दागिन्यांसह दहा हजार रोख रक्कम लंपास केली. याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
श्रीकांत गवस हे नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले तर त्यांची पत्नी घर बंद करून काजू बागेत कामासाठी गेली. यावेळी त्यांनी घराला कुलूप केले होते. मुलांना शाळेत सोडून श्रीकांत गवस परतले असता कुलूप फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आतून बंद असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी पाठीमागे जाऊन पाहिले असता मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. यामुळे घरात चोरी झाल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, हेड कॉन्स्टेबल रामचंद्र मळगावकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडले. त्यानंतर घरा कुणी येऊ नये म्हणून चोराने दाराला आतून कडी घातली. घरातील कपाट फोडून कपाटातील सोन्याच्या दोन चेन, दोन अंगठी, कानातील रिंग असे साधारण दीड लाखांहून अधिक किमतीचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याचे दिसून आले. श्रीकांत यांच्या पत्नीने मंगळसूत्र दुसर्या ठिकाणी ठेवल्याने ते चोरट्याच्या हाती लागले नाही. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा अधिक तपास दोडामार्ग पोलिस करत आहेत.
गेल्या काही दिवसांत तालुक्यात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच माटणे येथे दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण आहे. सध्या या चोर्यांचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यात पोलिस अपयशी ठरल्यास या घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या चोरींचा छडा तत्काळ लावावा, अशी मागणी केली जात आहे.