दोडामार्ग : हत्ती पकड मोहीम राबविण्यासाठी छेडलेल्या ठिय्या आंदोलनाने चौथ्या दिवशी उग्र वळण घेतले. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनाची दखल घेत नसल्याचा आरोप करत संतप्त आंदोलकांनी थेट दोडामार्ग वनक्षेत्रपाल कार्यालयालाच वेढा घातला. कार्यालयाचा मुख्य दरवाजाही कर्मचाऱ्यांना उघडू न देता दरवाजासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर वनविभागाच वरिष्ठ अधिकाऱ्यांंशी चर्चा झाल्यानंतर तब्बल चार तासानंतर कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले. मात्र, वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चौथ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरू होते.
तिलारी खोऱ्यात हत्तींचा उपद्रव रोखणे कठीण बनले आहे. हत्तींच्या त्रासामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. गेली 23 वर्ष हत्ती मानव संघर्ष चालू आहे. तालुक्यातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी आपले दुःख वेळोवेळी शासन दरबारी मांडण्याच्या अतोनात प्रयत्न केला. मात्र, आश्वासना व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. आश्वासनांचे गाजर दाखविणाऱ्या सरकार व प्रशासना विरोधात स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय देसाई, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, कळणे सरपंच अजित देसाई यांसह शेतकऱ्यांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे.
जो पर्यंत मुख्य वनसंरक्षक येऊन आमच्या प्रश्नांचे निरसन करत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नसल्याचे सांगत आंदोलन सुरूच ठेवले आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलककर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलनकर्ते दरवाजावरच ठाण मांडून बसले. वन कर्मचाऱ्यांना दरवाजाचे टाळे खोलण्यास विरोध करत आंदोलनाला वेगळी दिशा दिली. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुपारी 2 वा. पर्यंत कार्यालया बाहेर तिष्ठत रहावे लागले.
दोन दिवसांत बैठक घेऊ : मुख्य वनसंरक्षक
दोडामार्गचे वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांनी कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून त्यांची थेट आंदोलन कर्त्यांशी चर्चा घडवून आणली. यावेळी मुख्य वनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी आपण येत्या दोन दिवसात दोडामार्ग येथे येऊन बैठक घेणार असल्याचे सांगत कार्यालयाचा दरवाजा उघडण्याची विनंती केली. या चर्चे नुसार आंदोलन कर्त्यांनी कार्यालयाचा दरवाज उघडण्यास सहमती दर्शविली. परंतु, जो पर्यंत मुख्य वनसंरक्षक येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशार देत आंदोलन सुरू ठेवले.
आ. दीपक केसरकरांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी
स्थानिक राजकीय पदाधिकारी हे फक्त निवडणुकी पुरते हत्ती प्रश्नांचे भांडवल करतात. गेली चार दिवस हत्ती प्रश्नावर ठिय्या आंदोलन चालू आहे. परंतु, काही मोजके पदाधिकारी वगळता अन्य राजकीय पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाट फिरविली आहे. स्थानिक आमदारांना आंदोलनाला भेट द्यावी, असे वाटलेले नाही. तालुक्यातील शेतकरी बरबाद झाला असून त्याचे दुःख त्यांना दिसत नाहीत का? राजकारण करा पण, शेतकऱ्यांचे हित जोपासा, त्यांच्या पाठीशी उभे रहा. शेतकऱ्याला अभय द्या, अशी खरमरीत टीका प्रवीण गवस यांनी केली.