

पणजी : गेले अनेक महिने सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास परिसरात आणि चंदगड तालुक्यात मुक्कामाला असलेला बाहुबली टस्कर पुन्हा एकदा तिळारीत दाखल झाला. बाहुबली हा ओंकारचा पिता असून ओंकार तिळारीत आल्यावर तो चंदगड तालुक्यातून तिळारीकडे येण्यासाठी निघाला होता. तो आज, शुक्रवारी पहाटे ४.३५ वा. च्या दरम्यान वीजघर नदीपात्रातून जंगल भागात गेला आहे. तो ओंकारच्या दिशेने त्याची भेट घेण्यासाठी जात असावा, अशी शक्यता वन विभागाने वर्तविली आहे.
ओंकार आणि त्याच्या आईची यापूर्वी १९ डिसेंबरला तेरवण मेढे येथील धरणाजवळ रात्री भेट झाली होती. त्यानंतर ५ हत्तींचा कळप आणि ओंकार वेगवेगळ्या दिशेला गेले. मात्र, ते सर्वजण जवळपास वावरत होते. त्यानंतर ओंकार काल, गुरुवारी रात्री ८.२१ च्या दरम्यान तेजस गावडे यांच्या शेताकडून बांबर्डे येथील जंगल भागात गेला आहे. त्यानंतर ओंकार घाटीवडे येथील मंगळ मोडी भागात असल्याची माहिती वन विभागाने दिली.
या भागात पितापुत्राची भेट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ओंकारची आई, टस्कर गणेश, छोटी मादी, दोन पिल्ले असा ५ हत्तींचा कळप सकाळी ८.४६ वा. च्या दरम्यान केर बांदिवळ येथील जंगल भागात आहे. गेले अनेक दिवस तो कळप वीजघर -बांबर्डे परिसरातील जंगल भागात होता. त्यानंतर तो मोर्ले, केर, पाळ्ये भागात पोचला आहे. नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा ७ हत्तींचा कळप तिलारी खोऱ्यात दाखल झाला आहे. त्यात दोन मोठे टस्कर (गणेश आणि बाहुबली), निमवयस्क टस्कर (ओंकार), मोठी मादी, छोटी मादी आणि दोन पिल्ले यांचा समावेश आहे.