दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचा शिक्षण विभागाचा कारभार ज्या कार्यालयातून चालतो ते कार्यालय पाहिलेतर आश्चर्यचकित व्हाल, अशी विदारक स्थिती या कार्यालयाची आहे. गेले दोन पावसाळे येथील अधिकारी, कर्मचारी पावसामुळे होणार्या गळतीमुळे हैराण आहेत. संपूर्ण इमारत ताडपत्री झाकण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात तर अधिकारी व कर्मचार्यांना इमारतीत बसणे देखील कठीण बनले होते.
दोडामार्ग तालुक्यात 57 महसुली गावांमध्ये मिळून जि. प.च्या 98 प्राथमिक शाळा आहेत. तर 15 माध्यमिक शाळा व तीन महाविद्यालये आहेत.
या सर्व शिक्षणसंस्थांचे नियंत्रण ज्या इमारतीतून चालतो ती इमारतच सध्या धोकादायक बनली आहे. इमारतीचे संपूर्ण छप्पर गळत असून कर्मचार्यांना दैनंदिन काम करणेही कठीण बनले आहे. इमारतीच्या छप्परावर ताडपत्री अंथरून ही गळती रोखण्याचा प्रयत्न कर्मचार्यांनी केला आहे. पण अलीकडे झालेल्या मुसळधार पावसाने ही ताडपत्री ही निकामी ठरली.
गेली दोन वर्षे ही इमारतीत पावसाळ्यात गळत असल्याने इमारत देखील जीर्ण होत आहे. येथील गटशिक्षणाधिकार्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. मात्र पावसाळा संपेपर्यंत येथील अधिकारी व कर्मचार्यांना जीवावर उधार होत व कसरत करत काम करावे लागणार आहे.