दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात घडलेली एक हृदयद्रावक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. परिसरातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास तिच्या नातेवाईकांनी नकार दिला. या असंवेदनशील निर्णयामुळे त्या वृद्धेला शेवटचा सन्मान मिळेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, माणुसकी अजूनही शिल्लक आहे हे दाखवत दोडामार्गच्या नगरसेवकांनी पुढाकार घेत स्थानिकांच्या मदतीने त्या वृद्धेवर अंत्यसंस्कार केले.
या घटनेने एकीकडे कौटुंबिक संबंधांतील ढासळलेली नाती व वाढती बेदली दाखवून दिली तर दुसरीकडे समाजात अजूनही जिवंत असलेली माणुसकी व सहद्यता दिसून आली. दोडामार्ग -सावंतवाडी परिसरात एका घरात भाडेतत्त्वावर दोन वृद्ध बहिणी राहत आहेत. यातील एकीचे वय 75 तर दुसरीचे वय 80 वर्षे. रविवारी रात्री 75 वर्षे वय असलेल्या अपर्णा चिपळूणकर यांचे निधन झाले. या घटनेची माहिती नगरसेवक राजेश प्रसादी व स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर यांना समजताच त्यांनी या वृद्धेच्या घरी जात तिच्या बहिणीकडे नातेवाईकांबाबत विचारणा केली. मात्र नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याचे बहिणीने सांगताच त्यांना धक्का बसला. त्या नंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न दवडता वैद्यकीय सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अंत्यविधीसाठी आवश्यक सर्व व्यवस्था केली.
रविवारी सकाळी धार्मिक विधी करत त्या वृद्ध महिलेच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सामाजिक कार्यकर्ते अमरेश गुरव, बाबू ताटे, प्रताप राऊळ, साई कुंदेकर, बळीराम सोनवणे, विनय देसाई व न.पं. कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवक व नागरिकांनी दाखवलेली ही संवेदनशीलता व कर्तव्यतत्परता खरंच कौतुकास्पद आहे. वृद्ध महिलेच्या जीवनाचा शेवट जरी एकटेपणात झाला तरी तिच्या अंत्यसंस्काराला मानवतेचा स्पर्श लाभला, हीच तिला खरी श्रद्धांजली ठरली.