उदय बापर्डेकर
मालवण : हरित लवादाच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील ऐतिहासिक धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करणे, तलावाच्या पाण्यामध्ये कपडे-भांडी धुणे तसेच तलावात आंघोळ करणे यावर कायमस्वरूपी मनाई आदेश निर्गमीत करण्यात आल्याची माहिती मालवण तहसीलदार सौ. वर्षा झालटे यांनी दिली. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धामापूर तलावाला ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि 500 वर्षे जुन्या कार्यक्षम जल व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानामुळे आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन आणि जलसिंचन आयोगाने (ICID) जागतिक वारसा जल व्यवस्थापन स्थळ (WHIS) पुरस्कार प्रदान केला आहे.
धामापूर तलाव तर्फे मालवण शहर आणि धामापूर, काळसे, कुंभारमाठ गावांना पिण्याचे पाणी पुरवठ्यासह अनेक पर्यावरणीय सेवा प्रदान केली जाते. यात काळसे आणि धामापूरच्या शेतकर्यांसाठी सिंचन, गोड्या पाण्यातील माशांची पैदास, भूजल पुनर्भरण, सभोवतालच्या वन परिसंस्थेला आधार, पुराला प्रतिबंध आणि पर्यावरणाभिमुख पर्यटन यांचा समावेश आहे. हरित न्यायाधिकरण पुणे यांचेकडील ज- क्र. 74/2025 खटल्या मधील मागणी क्र. 1 अन्वये धामापूर तलावात मूर्ती विसर्जन, कपडे-भांडी धुणे यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
जेणेकरुन तलावाची पर्यावरणीय अखंडता जपता येईल. तसेच मूर्तीमध्ये धातूच्या पिन, प्लास्टिक आणि काचेसह रासायनिक रंग आणि जैवविघटन न होणारे सजावटीचे साहित्य वापरले जाते. यामुळे सदर तलावात गाळ साचणे, पाणी धारण क्षमता कमी होणे, जलचरात अडथळा, युट्रोफिकेशन आणि जलचरांना नुकसान होते. त्यामुळे तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन धामापूर तलावात मूर्ती विर्सजनासाठी कायम स्वरूपी मनाई आदेश जारी केले आहेत.
धामापूर तलाव पाण्यामध्ये कपडे-भांडी धुणे, तलावात आंघोळ करणे, तलावाच्या पाण्यामध्ये अस्थी विसर्जन करणे किंवा अन्य कोणत्याही वस्तूंचे विसर्जन करणे, तलावाच्या पाण्यामध्ये सांडपाणी किंवा अन्य द्रव पदार्थ सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी ही पोलिस विभाग, महसूल विभाग, मालवण नगरपालिका, धामापूर ग्रामपंचायत, जलसंपदा विभाग हे करतील, असे तहसीलदारांच्या आदेशात म्हटले आहे.