युवतीचा विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवगडमध्ये घडली. File Photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : विनयभंग प्रकरणातील संशयितांना न्यायालयात चालत न्या

पुढारी वृत्तसेवा

देवगड : युवतीची छेड काढल्याप्रकरणी पोलिस अटकेत असणार्‍या हरिराम मारुती गीते (33, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी दुपारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. मात्र, तत्पूर्वी देवगड ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याबाहेर आक्रमक भूमिका घेत सर्व संशयितांना न्यायालयात पायी चालत नेण्याची विनंती केली. संशयित नराधमांचे चेहरे जनतेसमोर आले पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, पोलिसांनी कायदा व सुरक्षिततेच्यादृष्टीने ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन करून सर्व संशयितांना चोख पोलिस बंदोबस्तात देवगड न्यायालयासमोर हजर केले. देवगड न्यायालयाने सर्व संशयितांना 11 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून संशयितांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलिस स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

देवगड शहरात पर्यटक म्हणून आलेले संशयित हरिराम मारुती गीते (33, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), माधव सुगराव केंद्रे (33, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), सटवा केशव केंद्रे (32, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), श्याम बालाजी गीते (35, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गीते (33, रा. बदलापूर (पू), जि. ठाणे), प्रवीण विलास रानडे (34, मधुबन सिटी, वसई (पू)) या संशयितांनी देवगड बाजारपेठ आनंदवाडी नाका येथे युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व संशयितांची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायं. 5.30 वा. च्या सुमारास घडली होती. पोलिसांनी पीडित युवतीच्या तक्रारीनुसार सर्व संशयितांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायायलाने संशयितांना 28 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, शनिवारी सकाळी देवगड पोलीस संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेत होते. यावेळी ग्रामस्थांनी संशयितांना चालत न्यायालयापर्यंत न्यावे. जेणेकरून सर्व जनतेला संशयितांचे चेहरे दिसले पाहिजेत. या घटनेत अन्य एक संशयित असण्याची शक्यता असून त्याने संशयितांची गाडी पळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अद्याप का गुन्हा दाखल केला नाही? असा प्रश्न पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना ग्रामस्थांनी केला.

पोलिस निरीक्षक श्री.देवकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कायदा व सुरक्षिततेच्यादृष्टीने संशयितांना न्यायालयापर्यंत पायी चालत नेणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक देवकर यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी संशयितांना नेण्यासाठी वाहन पोलिस स्थानकापासून 20 फूटावर उभे केले. यावर संशयितांना वाहनापर्यंत तरी चालत न्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. श्री. देवकर यांनी ग्रामस्थांनी काही अंतरावर उभे राहावे, अशी विनंती केली. मात्र, ग्रामस्थांनी आमच्यासमोर संशयितांना वाहनात बसवावे, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी ही मागणीही धुडकावून लावल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. संशयितांना पाठीशी घालू नका. ग्रामस्थांनी पोलिसांना आजपर्यंत सहकार्य केले आहे. पुन्हा अशी घटना घडल्यास ग्रामस्थ परस्पर न्याय करतील, असा इशारा ग्रामस्थांनी पोलिसांना दिला.

पोलीस निरीक्षक देवकर यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ग्रामस्थ काही अंतर मागे हटले. पोलिसांनी मानवी कडे करून संशयितांना पोलिस वाहनात बसविले. यावेळी सर्व संशयितांना बुरखा घातला होता. यावेळी ग्रामस्थांनी ‘संशयितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’, ‘पीडित युवतीला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा दिल्या. बंटी कदम, पप्पू कदम, निशिकांत साटम, हर्षा ठाकुर, शामल जोशी, सुधीर मांजरेकर, राजू पाटील, गुरुदेव परुळेकर, विशाल कोयंडे, किसन सूर्यवंशी, नाना कांदळगावकर, पोलीस पाटील आंचल कांदळगावकर, विलास रुमडे, राजू जोशी, निनाद देशपांडे, अभय बापट, संतोष तारी, विशाल मांजरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT