Mapping Pudhari
सिंधुदुर्ग

Devgad Panchayat Samiti | सर्वसामान्य वेटिंगवर, तर एजंटांना तत्काळ नकाशे !

Devgad Panchayat Samiti | सर्वसामान्य वेटिंगवर, तर एजंटांना तत्काळ नकाशे !

पुढारी वृत्तसेवा

देवगड : पुढारी वृत्तसेवा

देवगड भूमिअभिलेख कार्यालयात सर्वसामान्य खातेदारांनी मागणी करूनही जमिनीचा नकाशा मिळत नाही. मात्र एजंटांनी मागणी केल्यानंतर तत्काळ नकाशा कार्यालयातून दिला जातो, असा गंभीर आरोप उपसभापती अमोल लोके यांनी पंचायत समिती मासिक सर्वसाधारण सभेत केला. याप्रकरणी महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.

देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सोमवारी सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, सहा. गटविकास अधिकारी विनायक पाटील उपस्थित होते.

तालुक्यातील कोणताही आंबा बागायतदार, शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहता कामा नये. याबाबतची आकडेवारी मागवून ती सभागृहात सादर करा, अशी मागणी सदाशिव ओगले यांनी केली. नुकसानभरपाईबाबत प्रत्यक्ष गावात जावून तलाठी, कृषीसहाय्यक यांनी माहिती घेवून प्रकरणे तयार करावीत अशी सुचनाही ओगले यांनी केली.

सभागृहाचे माजी सदस्य अरविंद भोगले यांना जादा उत्पन्न दाखवून घरकूल योजनेतून अपात्र ठरविले आहे. तसेच हिंदळे येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका ग्रामस्थाचेही जादा उत्पन्न दाखवुन घरकुल योजनेतून अपात्र ठरविले आहे. चुकीचा पध्दतीने सव्र्व्हे करून लाभापासून वंचित ठेवणाऱ्या सर्व्हे करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई प्रस्तावित करावी, अशी मागणी श्री. ओगले यांनी केली. कोटकामते जि.प. शाळेसमोर बसवलेली खेळणी काढून त्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे.

यावेळी संबंधि मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी कुठलाही प्रतिबंध केला नाही, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी श्री. ओगले यांनी केली. मुणगे तिठा येथे गतिरोधक नसल्याने अनेक अपघात होतात. तेथे गतिरोधक बसविण्यात यावा अशी मागणीही श्री. ओगले यांनी केली.

देवगड हा डोंगरी तालुका असल्याने खास बाब म्हणून नवीन साकव व जुने साकव दुरूस्तीसाठी जादाचा निधी द्यावा, शाळांची दुरूस्ती व नवीन बांधकामे १५ जूनपर्यंत पूर्ण करावीत, अशी मागणी श्री. ओगले यांनी केली. वीजेचे जीर्ण व गंजलेले पोल यांचा सर्व्हे करून नवीन पोल बसविण्यात यावेत अशी सूचना सभापती गणेश राणे यांनी केली.

तांबळडेग-दक्षिणवाडा ग्रामस्थांनी पाणी प्रश्नाबाबत १ मे रोजी उपोषणाला बसण्याची नोटीस दिली होती, मात्र आपल्या समक्ष पाणीपुरवठा अधिकारी व संबंधित ग्रामसेवक यांनी पाण्याची व्यवस्था करतो, असे आश्वासन त्या ग्रामस्थांना दिल्यामुळे त्यांनी उपोषण थांबविले होते. मात्र अद्यापही त्या ग्रामस्थांना पाण्याची कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे त्यांनी आपल्याला उपोषणाला बसणार असल्याचे सांगीतले आहे. आश्वासन देवूनही पाण्याची व्यवस्था न करणाऱ्या संबंधित पाणीपुरवठा अधिकारी व ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशा सुचना उपसभापती अमोल लोके यांनी दिल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT