Western Region Rain File Photo
सिंधुदुर्ग

Devgad Heavy Rain | देवगड तालुक्यात मेघगर्जनेसह वरुणराजाची दमदार हजेरी

Devgad Heavy Rain | १०३ मिमी पाऊस; १५ हून अधिकवेळा विजेचा लपंडाव, रस्ते जलमय

पुढारी वृत्तसेवा

रविवारी पहाटे साडेतीन वाजल्यानंतर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरींनी देवगड तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या दमदार पावसात तालुक्यात तब्बल १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पहिल्याच पावसाने देवगड-जामसंडे शहरातील अपूर्ण, दुर्लक्षित आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांचा बुरखा फाडला.

गटारांची वेळेत साफसफाई न झाल्याने अनेक भागांत पाणी साचले, तर मोठ्या प्रमाणावर गाळ रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, जवळपास १५ हून अधिक वेळा विजेचा लपंडाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जामसंडे शहरातील अनेक बंदिस्त गटारांच्या मुखावर प्लास्टिक व कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा थांबला होता. त्यामुळे जामसंडे फाटक, क्लासेस परिसर तसेच सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नागरिकांची गैरसोय झाली.

नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने तातडीने नालेसफाईची मोहीम हाती घेतली. स्वच्छता सभापती तसेच नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी स्वतः मैदानात उतरल्याने नागरिकांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले. दरम्यान, जामसंडे नेनेनगर येथे नुकतेच बांधण्यात आलेले गटार पहिल्याच पावसात कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या घटनेनंतर उपरोधिक पोस्टचा अक्षरशः पाऊस पडला. शहरातील गटारे तुंबल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला. देवगड कॉलेज रोड परिसरातील रामेश्वर मेडिकल, कोकणरत्न चहा, मिनल फुटवेअर आणि सायकल स्टोअर्स या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

पहिल्याच पावसाने शहरातील विकासकामांची वास्तवस्थिती नागरिकांसमोर आणल्याची चर्चा सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घरांची व साहित्याची आवराआवर सुरू असतानाच अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. विजांचा लपंडाव आणि मेघगर्जनेसह कोसळणाऱ्या सरींमुळे वातावरणात भीतीचे सावट निर्माण झाले होते.

दुसरीकडे देवगड-निपाणी महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या सुरू असलेल्या कामालाही पावसाने आरसा दाखवला. दाभोळे येथे एकपदरी रस्ता अर्धवट अवस्थेत असून पर्यायी बाजूचा कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही किरकोळ अपघातही घडल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित विभागाने तातडीने या कामांची दखल घेण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे. पहिल्याच पावसातून वरुणराजाने प्रशासन आणि महामार्ग कंत्राटदाराला स्पष्ट इशारा दिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात हा निष्काळजीपणा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT