पडवणे : हापूसच्या पहिल्या पेटीचे पूजन करताना शिर्सेकर कुटुंबातील सदस्य. (Pudhari Photo)
सिंधुदुर्ग

Diwali Festival Devgad Hapus Mango | दिवाळी मुहूर्तावर देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना

आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर होणार विक्रीचा शुभारंभ; पेटीला 10 ते 12 हजार रु. दर मिळण्याची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

देवगड : देवगड तालुक्यातील पडवणे येथील आंबा बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सोमवारी 6 डझन हापूस आंब्यांची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला रवाना केली. यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसची पहिल्या पेटी विक्रीस पाठविण्याचा मान श्री. शिर्सेकर यांना मिळाला आहे. या आंबा पेटीला 10 ते 12 हजार रूपये एवढा दर मिळेल, असा विश्वास श्री. शिर्सेकर यांनी व्यक्त केला.

पडवणे गावातील शिर्सेकर यांच्या आंबा बागेतील कलमांना जुलै महिन्यात मोहोर आला होता. त्यातील दोन कलमांवरील मोहराचे त्यांनी प्लास्टिक आवरण घालून संरक्षण केले होते. योग्य काळजी व मोहर संरक्षक प्रतीजैविकांच्या फवारणीमुळे या कलमांवर सुमारे पाच पेट्या ( 350 ते 360 फळे) इतकी फळधारणा झाली. त्यापैकी 6 डझनाची पहिली पेटी त्यांनी 20 ऑक्टोबर रोजी वाशी मार्केटकडे रवाना केली.

वाशी मार्केटमधील फळांचे व्यापारी नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनी या दलालमार्फत ही आंबापेटी विक्रीस ठेवली जाणार असून, ही विक्री लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मंगळवारी होणार आहे. लक्ष्मीपूजना दिवशी आंबा पेटी विक्रीस ठेवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बाजार समितीतील दलालांकडून सांगण्यात आले. याआधीही, सुमारे पाच वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात श्री. शिर्सेकर यांनी हापूस पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान मिळवला होता. मात्र, यावर्षी त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच आंबा पेटी पाठवून विक्रमी प्रारंभ केला आहे.

कोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिलेच बागायतदार ठरले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर विक्री दरम्यान या आंबापेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT