

कुडाळ : कुडाळ एसटी आगाराच्या ताफ्यात पुन्हा नव्याने 3 एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. यापूर्वी नव्या 5 बसेस आगाराला मिळाल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत बीएस 6 प्रणालीच्या एकूण 8 नव्या कोर्या बसेस या आगाराला मिळाल्या आहेत. या नवीन अद्ययावत एसटी बसेसमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहे.
कुडाळ आगाराची बससेवा सुधारून प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा मिळावी यासाठी आ. नीलेश राणे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन नवीन बसेसची मागणी केली होती. तसेच याबाबत पाठपुरावा चालू ठेवला. त्यांच्या प्रयत्नांतून अलिकडेच या आगाराला नव्या 5 एसटी बसेस प्राप्त झाल्या होत्या. या बसेसचे आ.राणे यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर बसेस प्रवाशी सेवेतही रूजू झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा 3 नवीन बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. एकूण 10 नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती. पैकी 8 बसेस प्राप्त झाल्या असून, उर्वरित 2 बसेस लवकरच मिळणार आहेत. रविवारी दाखल 3 बसेसचा लोकार्पण सोहळा आ.राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याबसेस बीएस 6 तंत्रज्ञान प्रणालीच्या असून अशोक लेलॅण्ड कंपनी बनावटीच्या आहेत. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्वःमालकीच्या आहेत. या बसेस पुणे, विजापूर व अक्कलकोट मार्गावर धावणार आहेत, अशी माहिती आगार प्रमुख रोहित नाईक यांनी दिली.