नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
देवगड हापूसची मुंबई वारी सुरू असताना देवगड व परिसरातील प्रतवारी केलेला आंबा सध्या मुंबई- गोवा महामार्गावर विक्रीस आला आहे. सध्या काही आंबा विक्रेते थेट बागायतदाराकडून आंबा घेत महामार्गावर विक्री करत आहेत. कणकवलीसह हुंबरट, बेळणे, नांदगाव, कासार्डे व तळेरे परीसरात हापूस विक्रीसाठी स्टॉल दिसून येत आहेत. यात मोठे आंबे १००० ते १२०० रुपये प्रति डझन तर लहान साईजचा आंबा ६०० ते ७०० रुपये प्रति डड़ान असा दर आहे.
अवकाळी पाऊस आणि विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने या वर्षी आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेत फेब्रुवारी-मार्च महिन्यात येणारा हापूस या वर्षी एप्रिल अर्था संपत आला तरी बाजारात उपलब्ध नव्हता. शिवाय दरही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर होते. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील हापूस आंबा काही प्रमाणात स्थानिक बाजारपेठांमधून विक्रीस येऊ लागला आहे.
बागायतदारांनी या प्रतिकूल परिस्थितीतही विविध औषधांच्या फवारण्या करून आंबा फळे संरक्षित केली आहेत. अवकाळीचे संकट व वातावरणातील बदलामुळे सध्या आंबा बागायतदार तातडीने मुंबई मार्केट व थेट ग्राहकांकडे पोचवण्यात व्यस्त आहेत. देवगड हापूस आंब्याला मुंबई, पुणे व इतर राज्यासह विदेशात पसंती आहे.
यंदा आंबा कमी असल्याने असल्याने दरही चांगला मिळत आहे. त्यात हापूसची स्पर्धा करण्यासाठी इतर राज्यातील आंबेही बाजारात दाखल झाल्याने आता देवगड पट्टयातील आंबा स्थानिक बाजारात दाखल होत आहे.
सध्या मुंबई-गोवा महामार्गावर या हापूस विक्रीचे स्टॉल जागोजागी दिसत आहेत. महामार्गावरून जाणारे पर्यट हा हापूस खरेदीसाठी पसंती दर्शवत आहेत. मोठे व प्रतवारी केलेले फळ मार्केटमध्ये पाठवल्यानंतर शिल्लक राहिलेला आंबा स्थानिक विक्रेते खरेदी करून तो विक्री करत आहेत.. यामुळे हंगामी आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
एक व दोन डझनचे बॉक्स मधून हा आंबा विक्रीस ठेवला आहे. यामुळे स्थानिक ग्राहक व पर्यटकांना ते खरेदी करणे सोईस्कर ठरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी व बागायतदारांनी आंबे दलाला देण्या ऐवजी ते स्वतः विकण्यास प्राधान्य देत आहेत.
याचा थेट फायदा शेतकरी, बागायतदार व ग्राहकांना होत आहे. महामार्गावर सध्या हुंबरट, बेळणे, नांदगाव, असलदे, कासार्डे भागात आंबे विक्रीसाठी तात्पुरते स्टॉल उभारण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत ही विक्री सुरु असून प्रतिसाद मिळत आहे.