देवगड : आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ, देवगड यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी देवगड गणपती मंदिर ते तहसील कार्यालयपर्यंत घोषणा देत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे शेतकर्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघाच्यावतीने शेतकर्यांचा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हवामानावर आधारित फळ पीक विम्याचे निकष कोकण विभागासाठी स्वतंत्र करण्यात यावेत, सध्याच्या निकषांपेक्षा वेगळे ठेवावेत, फळ पीक विमा कालावधी 1 ऑक्टोबर ते 31 मे पर्यंत वाढवावा, पोटखराबा लागवडी अंतर्गत समाविष्ट करून संपूर्ण क्षेत्राचा विमा करण्यात यावा, शेतकर्यांनी भरलेल्या विमा हप्त्यामधून कंपन्यांना फक्त फायदा मिळतो, मात्र शेतकर्यांना 100 टक्के नुकसान भरपाई दिली जात नाही; यामध्ये तात्काळ बदल व्हावा, स्कायमेट कंपनीकडून मिळणारा हवामान डाटा संशयास्पद असल्याने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नवीन यंत्रणा उभारून हवामान माहिती थेट शासनाकडे पोहोचवावी, कृषी विद्यापीठांमार्फत शेतकर्यांना अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवण्यावर भर दिला जावा, विमा निकष कालावधी संपल्यानंतर 1 महिन्यात नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळावी, मागील विमा परतावा मिळण्यापूर्वी नवीन योजना लागू करू नयेत, भेसळयुक्त खते व कीटकनाशके ओळखण्यासाठी आणि माती परीक्षणासाठी प्रस्तावित रामेश्वर संशोधन केंद्र, गिर्ये येथे प्रयोगशाळा मंजूर करावी, पीकपाहणी नोंद केवळ नव्या लागवडींसाठी बंधनकारक ठेवावी, जुन्या बागांवरील सक्तीची नोंद रद्द करावी, मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा नुकसानीसाठी सरसकट कर्जमाफी मिळावी, कोकण आंबा बोर्ड तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, मुंबई मार्केटमध्ये आंबा विक्रीची सध्याची दलालांवर आधारित पद्धत बदलून थेट शेतकरी विक्रीस हमीभावाची यंत्रणा उभारावी, स्कायमेटकडील डाटा आधारित नुकसान भरपाई प्रीमियमपेक्षा कमी मिळत असल्यामुळे देवगड, पडेल, मिठबाव या तीन मंडळांमधील विसंगती दूर करावी,सन 2022-23, 23-24 व 24-25 या वर्षांतील विमा परतावा रक्कम काही शेतकर्यांच्या बँक खाती बंद झाल्यामुळे विमा कंपनीकडे परत गेली आहे, ती पुन्हा शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल असे नियोजन करावे, संघाच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांपासून वातावरण बदलामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
शासकीय यंत्रणांचा अपुरा प्रतिसाद शेतकर्यांचे संकट अधिकच गडद करतोय, त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक या मागण्यांचा विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात या मागण्या नमूद करण्यात आल्या होत्या.
मोर्चात शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रूमडे, उपाध्यक्ष रामदास अनभवणे, सचिव संकेत लब्दे, खजिनदार शुभम चौगुले, चंद्रकांत गोईम, समशेर खान, विकास दीक्षित, सौ.शामल जोशी, सौ.रंजना कदम, विमल बलवान, निलेश पेडणेकर, गुरूनाथ कांबळी, जयवंत लाड, अरविंद वाळके, राजीव वाळके, नाना गोडे, श्रीकृष्ण साटम, सत्यवान गावकर, इंद्रनील कर्वे, कुंदन घाडी, राजन किंजवडेकर, भाई कदम आदी शेतकरी सहभागी झाले होते.