देवगड ः महाराष्ट्र राज्याचा सागरी हद्दीत अवैधरित्या मच्छिमारी करणाऱ्या कर्नाटक मधील परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली. देवगड सागरी हद्दीत सुमारे 14 वाव क्षेत्रात विनापरवाना मच्छिमारी करताना ही नौका सापडून आली.
मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक समुद्रात गस्त घालत असताना 20 डिसेंबर रोजी पहाटे कारवाई करण्यात आली. नौका ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आली. या नौकेवर तांडेलसह 7 खलाशी आहेत.देवगड मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक गस्ती नौकेद्वारे शनिवारी पहाटे समुद्रात गस्त घालत होते. त्यावेळी देवगड सागरी हद्दीत 14 वाव क्षेत्रात कर्नाटक उड्डपी, जि.मलपी येथील ‘महारथी’ ही ज्योती एन्.हरीक्रांता यांच्या मालकीची मच्छिमारी नौका मासेमारी करताना आढळली. गस्ती पथकाची नौका त्या नौकेजवळ पोहोचताच सदर परप्रांतीय नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र गस्ती नौकेने पाठलाग करून त्या नौकेला पकडले. ती परप्रांतीय नौका ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी देवगड बंदरात आणण्यात आली.