बांदा : डेगवे-वराडकरवाडी येथे जोसेफ फ्रान्सिस कुलासो यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहणारे गंगाराम दादू शिंदे यांचे घर फोडून चोरट्याने 1 लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. चोरीची ही घटना शनिवारी घडली. याबाबत बांदा पोलिस ठाण्यात शिंदे यांनी फिर्याद दिली असून पोलिसात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाराम शिंदे हे डेगवे-धनगरवाडी येथील रहिवासी असून त्यांनी बांदा-वराडकरवाडी येथील जोसेफ कुलासो यांची जमीन व घर भाडे करारावर घेतली आहे. ते गणेशोत्सवानिमित्त सहकुटुंब डेगवे येथील मूळ घरी गेले होते. चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडले व घरात प्रवेश करून कपाटातील 31.600 ग्रॅम वजनाची सुमारे 1 लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी याची कल्पना डेगवे पोलिसपाटील तसेच माजी सरपंच प्रवीण देसाई यांना दिली.
स्थानिकांनी चोरी झाल्याची माहिती शनिवारी दुपारी बांदा पोलिसांना दिली. सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, बांदा सहा.पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार धनंजय नाईक, प्रियांका परब यांनी घटनास्थळी पाहणी केली.
घटनास्थळी न्यायवैधक पथकाला पाचारण करून घटनास्थळाचे ठसे घेण्यात आले. तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान घरापासून नजीकच्या काही अंतरावर जात घुटमळला. बांदा पोलिसात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बांदा पोलिस करत आहेत.