सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवश्य यावे, कार्यकर्त्यांची भेट घ्यावी. परंतु, ज्या कार्यकर्त्यांना साधी भेट किंवा दर्शन सुद्धा मिळत नव्हते. आज त्यांच्याच घरोघरी त्यांना फिरण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांना काळाने शिकवलेला हा धडा आहे, अशी टीका राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज (दि.२४) सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
जिल्ह्यात येऊन गणपतीचे दर्शन घेतले, ही चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही या कोकणी जनतेसाठी काय केले, ते आधी तुम्ही सांगा. त्यानंतर माझ्यावर टीका करा, ज्या कोकणी जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले, त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकले नाही, हे दुर्दैवी असल्याचे केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.
ते म्हणाले की, आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते. तसेच हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे. मग तुम्ही या जिल्ह्यासाठी काय दिले ते सांगा. चांदा ते बांदा सारखी महत्वाकांक्षी योजना देखील गुंडाळण्यात आली. त्यावेळी तुमची अजित पवारां सोबत बोलण्याची हिंमत सुद्धा होत नव्हती. त्यामुळे आता येऊन काही सांगण्यात अर्थ नाही. ज्यावेळी आम्ही बोलू, त्यावेळी जनतेला सुद्धा कळेल की, हे आपल्यासोबत कशाप्रकारे वागत होते. कशामुळे पक्षाचे दोन भाग झाले. त्यावेळी भविष्यात तुमच्यासोबत एकही कार्यकर्ता राहणार नाही, असा इशारा केसरकर यांनी यावेळी दिला.
स्टॅलिन सारख्यांकडून सनातन धर्मावर टीका होत असताना त्यांना काही बोलण्याची हिंमत होत नाही, गद्दारी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची फारकत कोणी घेतली, अशी टीका केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुंबई शहर आणि उपनगरातील शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची एक संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. तर लवकरच गृहमंत्री अमित शहा यांची दिलेला भेट घेऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करणार आहे, यापूर्वी अशी मागणी करण्यात आली आहे. कारण हा महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे या मागणीचा सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा