विनायक राऊत  
सिंधुदुर्ग

Vinayak Raut : आघाडीबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील

विनायक राऊत यांचा विश्वास; महाविकास आघाडीच्या सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी ः सावंतवाडी-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी खासदार विनायक राऊत यांनी विश्वास व्यक्त केला की, माजी आमदार जयानंद मठकर यांच्या सूनबाईंना मठकरांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या आणि पैशाच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणातही तत्त्व जपणार्‍या सौ. मठकर यांना सावंतवाडीकर नक्कीच आशीर्वाद देतील. भाजपमध्ये खा. नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे दोन गट असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी यावेळी केली.

ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब,सुकन्या नरसुले, आणि उमेदवार सीमा मठकर उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, राजू शेटकर, शैलेश गवंडळकर आदी उपस्थित होते.

माजी खासदार विनायक राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडीतील समन्वयावर भाष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, ते योग्य ती दखल घेतील.

विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या गटांमधील अंतर्गत संघर्षावरही टीका केली. नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे दोन गट एकमेकांच्या विरोधात आहेत.नितेश राणे आणि निलेश राणे यांनी कोण मोठा हे दाखवून देण्याचा विडा उचलला आहे,असे ते म्हणाले.ते पुढे म्हणाले, स्वतःचे कार्यकर्ते नसल्यामुळे ते इतरांना विकत घेत आहेत. स्वार्थी आणि पैशाला हपापलेले लोक आम्हांला सोडून गेले असले तरी, निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबतच आहेत, असा ठाम विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, सुकन्या नरसुले, आणि उमेदवार सीमा मठकर आदी उपस्थित होते.

आम्ही दळभद्री राजकारण करणार नाही

कणकवलीतील नगरविकास आघाडीबद्दल बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, ही आघाडी पालकमंत्र्यांच्या विरोधात उभी राहिली आहे आणि तिचा उद्देश केवळ शहराचे हित साधणे हा आहे. ते म्हणाले, शिंदे सेना किंवा भाजपला घेऊन आम्ही दळभद्री राजकारण करणार नाही. माजी आमदार वैभव नाईक यांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT