

कणकवली ः कणकवली शहरातील ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते आपण आज जाणून घेतली. न.पं.निवडणूकीसाठी जर कणकवलीप्रेमी मंडळी शहर विकास आघाडीसाठी आग्रही असतील तर आमचा त्याला पाठिंबा असेल मात्र आमचे जे कट्टर विरोधक आहेत त्यांना मात्र यामध्ये स्थान असणार नाही. शहर विकास आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकारी देण्यात आले असून अद्याप त्याबाबत निर्णय झाला नसल्याचे ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खा. विनायक राऊत यांनी सांगितले.
गुरुवारी सायंकाळी विनायक राऊत यांनी येथील विजय भवन येथे ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, अनंत पिळणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.पत्रकारांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, कणकवलीमध्ये ठाकरे शिवसेनेकडे उमेदवार आहेत मात्र अद्याप आघाडीबाबत चर्चा पूर्ण झालेली नाही, त्यामुळे पुढचा निर्णय आपण घेवू शकलेलो नाही. काँग्रेसच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णयावर विनायक राऊत म्हणाले, ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे, त्यांना आम्ही थांबू शकत नाही.
कणकवलीत शहर विकास आघाडी होणार का? याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, या शहराला शहर विकास आघाडी पॅटर्न नवीन नाही, मागील निवडणूकीतही सर्व कणकवलीप्रेमींनी एकत्र येवून निवडणूकजिंकण्याचा प्रयत्न केला होता याची आठवण त्यांनी करून दिली. कणकवलीच्या हितासाठी जर शहर विकास आघाडी स्थापन होत असेल तर ठाकरे शिवसेना नक्कीच पाठिंबा देईल पण भाजप व गद्दार गट यांना त्या आघाडीत कोणत्याही परिस्थितीत स्थान दिले जावू नये असे आमचे मत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असतील? या प्रश्नाचे उत्तर देताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आमचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मिळणारा जनाधार मोठा आहे. त्यामुळे तेच आमचे उमेदवार असतील असेही विनायक राऊत यांनी सांगितले. आज कार्यकत्यार्ंशी आपण संवाद साधला मात्र मुलाखतीचा फार्स आम्ही करणार नाही. आमचे कार्यकर्ते डोळ्यासमोरील आहेत असेही राऊत म्हणाले.