Mithmumbari Bagwadi Jetty
देवगड : मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर प्रस्तावित कायकिंग पर्यटन प्रकल्पावरून मच्छीमार आणि प्रशासनातील संघर्ष तीव्र झाला आहे. स्थानिक मच्छीमारांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासह धमकी दिल्याचा आरोप असलेल्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांनी केली. पोलिसांनी दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास देवगड पोलीस ठाण्यासमोर ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कायकिंग प्रकल्पाच्या शुभारंभावेळी विरोध केल्याप्रकरणी सात स्थानिक मच्छीमारांवर गुन्हे दाखल झाल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. या कारवाईच्या निषेधार्थ सुमारे ५० मच्छीमारांच्या सह्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक शाम बुवा यांना देण्यात आले.
पारंपरिक मासेमारी हा येथील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. कायकिंग पर्यटनाला विरोध नसून, प्रकल्पामुळे मच्छीमारी व्यवसाय बाधित होऊ नये, एवढीच भूमिका असल्याचे उपरकर यांनी स्पष्ट केले. पर्यायी जागा उपलब्ध असताना मच्छीमार वापरत असलेल्या जेटीवरच प्रकल्पाचा आग्रह का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन मच्छीमारांशी संवाद साधला. कायकिंग प्रकल्पाच्या परवानग्या आणि प्रवासी जेटी बंद करण्याचे लेखी आदेश दाखवावेत, अशी मागणी त्यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. जेटी बंद करण्याचा आदेश तोंडी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा नाईक यांनी केला. प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांची चौकशी करून स्थानिकांना समान न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. धमकी दिल्याचा आरोप असलेल्यांवर कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा इशारा त्यांनी दिला.
या वेळी बंदर विभागाचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, मच्छीमार आणि महिला उपस्थित होत्या.
मच्छीमारांनी दिलेल्या निवेदनात नरेश डामरी, सागर गावकर, अनिल गावकर, समाधान तोडणकर, अमर तोडणकर, शुभम कदम, सोहम पारकर, अनिल कोरगावकर, ललित चांदोस्कर, ऋतिक धुरी, किरण पाटील, सिद्धेश माणगावकर, योगेश चांदोस्कर, लतीश गावकर, जीवन पाटील आणि मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर या १६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.