Devgad News : मिठमुंबरी बागवाडी जेटीवरील कायाकिंग प्रकल्पावरून पुन्हा वाद! स्थानिक - प्रकल्पकर्ते समोरा-समोर!

जेटी सील करण्याबाबत प्रशासनाला कळविणार- पोलीस निरीक्षक शाम बुवा
कायाकिंग प्रकल्पावरून स्थानिक मच्छिमार व प्रकल्पकर्ते यांच्यात वाद झाला
कायाकिंग प्रकल्पावरून स्थानिक मच्छिमार व प्रकल्पकर्ते यांच्यात वाद झाला
Published on: 
Updated on: 

देवगड: मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवरून कायाकिंग प्रकल्प सुरू करण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ आणि प्रकल्पकर्त्यांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. सुमारे तीन तास सुरू असलेल्या या वादावर सामंजस्याने तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित जेटी सील करण्याबाबत प्रशासनाला कळविण्यात येईल, असे देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी सांगितले. पुढील निर्णय होईपर्यंत दोन्ही बाजूंनी जेटीचा वापर करू नये, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. त्यानंतर दोन्ही गटांनी घटनास्थळावरून माघार घेतली.

मिठमुंबरी येथील नरेश डामरी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून बागवाडी जेटीवर कायाकिंग प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी ११ ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या विरोधामुळे तो स्थगित करण्यात आला होता. सोमवारी सकाळी १० वाजता प्रकल्पकर्त्यांनी पुन्हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला.

बागवाडी जेटीचा वापर स्थानिक मच्छीमार पारंपरिक व्यवसायासाठी करतात. त्यामुळे या ठिकाणी कायाकिंग प्रकल्प सुरू झाल्यास मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भूमिका स्थानिकांनी मांडली. स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आक्षेप घेत त्यांनी या जेटीवर प्रकल्प सुरू करण्यास विरोध दर्शविला. प्रकल्प सुरू करायचा असल्यास परिसरातील अन्य जेटीचा पर्याय निवडावा. स्थानिक व्यक्तींनी पुढाकार घेऊन प्रकल्प राबविल्यास सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

यावेळी नारायण तारी, उमेश तारी, रमेश तारी, प्रमोद आडकर, नीलेश तारी, सत्यवान नेसवणकर, बशिर शेख मुजावर, बंदा तारी, नाना तारी, लक्ष्मी तारी, अंजली आडकर, आशिष सादये, अभय पराडकर आणि आप्पा नेसवणकर यांच्यासह स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थ उपस्थित होते.

कायाकिंग प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या असून मिठमुंबरी ग्रामपंचायतीचा ठरावही असल्याचे सांगत प्रकल्पकर्त्यांनी विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तो सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार ॲड. अजित गोगटे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. प्रायोगिक तत्त्वावर काही काळ प्रकल्प सुरू करण्यास परवानगी द्यावी. या कालावधीत काही त्रुटी किंवा समस्या निर्माण झाल्यास त्यावर योग्य निर्णय घेता येईल, असे त्यांनी सुचविले. मात्र, स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

यावेळी मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर यांच्यासह प्रकल्पकर्त्यांच्या वतीने अमर तोडणकर, सागर गावकर, अनिल गावकर, हेमंत गावकर, अनिल कोरगावकर, सोहम पारकर, शुभम कदम, ऋत्विक धुरी, अॅड. सिद्धेश माणगावकर, चिन्मय खानविलकर, ललित चांदोस्कर आणि नीरज पोकळे उपस्थित होते. नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता सभापती बुबा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर आणि माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनीही दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी ग्रामस्थांनी परिसरातील अन्य जेटींचा पर्याय सुचविल्यानंतर प्रकल्पकर्त्यांनी त्या जागांची पाहणी केली. मात्र, तेथे प्रकल्प राबविताना अनेक अडचणी येण्याची शक्यता असल्याने त्यांनी त्या जागांबाबत नापसंती दर्शविली. या पाहणीदरम्यानही दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. पर्यायी जागांबाबत एकमत न झाल्याने वादावर तोडगा निघू शकला नाही.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी दोन्ही बाजूंना जेटीचा वापर थांबविण्याची सूचना केली. जेटी सील करण्याबाबत संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत आणि अनिलकुमार पोवार यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

दरम्यान, पोलिसांनी जेटी सील करण्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर स्थानिक मच्छीमारांनी ‘पारंपरिक मच्छीमारांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. यावर प्रकल्पकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा विषय विजय किंवा पराभवाचा नसून रोजगाराभिमुख आणि पर्यावरणपूरक प्रकल्पाला चर्चेतून मार्ग काढून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक तरुण अन्य व्यवसाय सांभाळून हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करीत असून, सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news