ओरोस ः जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली नोडल ऑफिर्ससची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक नियोजन, प्रशासनाची तयारी, जबाबदार्यांचे वाटप तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांनी जबाबदारी नीट समजून घेऊन दक्षतेने काम करावे. आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान केंद्रांची तयारी, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, मतदारांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. निवडणूक कालावधीत गैरप्रकार घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी सजग राहावे, आयोगाच्या सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करावे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास निवडणूक प्रक्रिया यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीस अति. जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, बालाजी शेवाळे, आरती देसाई, विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.