

दोडामार्ग ः कोलझर येथे खासगी वनक्षेत्रात झालेल्या वृक्षतोडप्रकरणी वनविभागाने दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र तपासाच्या दृष्टीने ही नावे देण्यास वनविभागाने नकार दिला असून पुढील कारवाई सुरू त्यांनी स्पष्ट केले.
कोलझर येथील डोंगरात काही अज्ञातांनी सुमारे 4 किलोमीटर लांबीचे उत्खनन केले होते. हा परिसर केंद्र सरकारने इकोसेन्सिटीव्ह झोन म्हणून जाहीर केला आहे. स्थानिकांच्या मालकी क्षेत्रात विनापरवाना घुसून हे उत्खनन झाले होते. या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात जंगली झाडे तोडून ती मुळासकट चोरून नेण्यात आली होती. स्थानिकांना याबाबत समजताच त्यांनी या विरोधात भूमिका घेतली. या उत्खननाची आणि वृक्षतोडीची माहिती मिळताच खडपडे वनक्षेत्रात वनपथकाने पंचनामा केला. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हाही दाखल करण्यात आला. ही कारवाई वनपाल किशोर जंगले, वनरक्षक सुबोध नाईक यांनी केली. याबाबत वनपाल किशोर जंगले म्हणाले, इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये झालेल्या या कृत्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण केली आहे. तेथील मोजमापे घेण्यात आली आहेत. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू असल्याने त्यांची नावे अद्याप उघड करू शकत नाही. या भागातील पर्यावरण राखण्याची जबाबदारी आम्ही सक्षमतेने पार पाडत आहोत. ग्रामस्थ पर्यावरण रक्षणासाठी पुढे येत असल्याची गोष्ट समाधानकारक आहे. त्यांना या कार्यात कायम सहकार्य मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.