गणेश जेठे
सिंधुदुर्ग : समुद्राच्या लाटा जेव्हा लाल रंगाच्या खडकावर आदळते तेव्हा त्याचे फेसाळलेले मनमोहक रूप पर्यटकांना वेडावते. सेल्फी काढण्यासाठी जेव्हा एखादा तरुण किंवा तरुणी त्याच खडकावर चढते तेव्हा येणार्या दुसर्या लाटेचा तडाखा त्यांना सहजपणे समुद्राच्या पोटात ढकलतो. कोकण किनार्यावर आजवर अशा अनेक दुर्घटना घडल्याने आहेत. समुद्रकिनार्यावर एक ‘डेंजर लाईन’ अस्तित्वात असते. भरती-ओहोटीच्या वेळी याच डेंजर लाईनची जागा बदलत राहते. हीच डेंजर लाईन खरी लक्ष्मणरेषा आहे.
शासनाने डेंजर लाईन, रिफ करंट, अंडर करंट, लाटांची उंची, भरती-ओहोटीच्या वेळा याची माहिती समुद्र किनार्यावरील पर्यटकांना सतत देणे अत्यावश्यक आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना आरंभणे हाच पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा मार्ग आहे. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता शिरोडा-वेळागर समुद्रकिनार्यावरही अशी डेंजर लाईन अस्तित्वात होती. पण तिचे अस्तित्व सांगणारी व्यवस्था तिथे उपलब्ध नव्हती. म्हणूनच त्या सातजणांना समुद्राच्या पोटात जावे लागले. कारण डेंजर लाईन नेमकी कुठे आहे हे त्या पर्यटकांना समजलेच नव्हते. ही डेंजर लाईन सहजपणे समजता येतही नाही. कारण प्रत्येक किनार्यावर तिची जागा वेगवेगळी असते. काही ठिकाणी ती समुद्रकिनार्यापासून 20 मीटरवर, तर काही ठिकाणी तिचे अस्तित्व 25 मीटर पर्यंतही जाते. अगदी काही ठिकाणी किनार्यापासून 10 मीटर अंतरावरही या डेंजर लाईनचे अस्तित्व असते.
समुद्रकिनार्यावरील भौगोलिक स्थिती, किनार्यावरील वाळूच्या थराची उंची, किनार्यावर असलेलेे मोठे खडक, रिप करंट तयार होण्यासाठी असलेली परिस्थिती असे संगळे फॅक्टर डेंजर लाईनची जागा ठरवतात. म्हणून प्रत्येक किनार्याचा समुद्राच्या पोटातील भौगोलिक स्थितीचा अभ्यास अधिक खोलवर करून त्याचे विश्लेषण करून त्याचे धोके समजावून सांगणारी यंत्रणा सतत कार्यरत ठेवावी लागेल. काही ठिकाणी समुद्रकिनार्यापासून काही फूट अंतरावर अचानक खोल खड्डा तयार होतो. किनार्यावरची वाळू समुद्राच्या लाटेबरोबर ओहोटीच्या वेळी आत फेकली जाते. पायाखालची वाळू बघता बघता सरकते. किनार्यावरील वाळूचा जो भाग आहे तो किनार्यावर सपाट असेल तर लाटांचे पाणी खूप पुढे पर्यंत येते. परंतु त्या लाटांची उंची नगन्य असते.
अशा अनेक घटना घडल्या आहेत की खडकावर उभे राहून सेल्फी काढणार्या पर्यटकाला एखाद्या मोठ्याला लाटेने सहज यावे आणि समुद्राच्या पोटात घ्यावे. अशावेळी कुणीतरी तिथे सांगणारा सरकारी माणूस हवा. त्या माणसाच्या सांगण्यामध्ये एक प्रकारचा धाक हवा. हा धाक निर्माण होण्यासाठी कायदे आणि नियमांची निर्मिती करून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी किनार्यावर प्रभावी फलकांची उभारणी आवश्यक आहे.
काही पर्यटक समुद्राच्या आकर्षणापोटी कुणाच्याही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. गोव्याचे अनेक पर्यटक आहेत की जे उत्साहात असतात, त्यांना तेथील सुरक्षा गार्ड जबरदस्तीने किनार्यावरून बाहेर काढतात. प्रसंगी कारवाई करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोकणात अशी उपाययोजना नाही. काही पर्यटक ऐकत नसतील तर त्यांना कायद्याचा धाकसुद्धा ठेवावा लागेल. कोकणच्या किनारपट्टीवर तसे त्या त्या भागातील ग्रामपंचायतींचे राज्य आहे. सरकारने त्या ग्रामपंचायतींशी संवाद साधून त्यांना काही यंत्रणा पुरवणे आवश्यक आहे. त्यांच्यावर जबाबदारीही सोपवावी लागेल. पर्यटकांकडून काही स्वरूपात कर घेऊन यंत्रणेची निर्मिती करणे गरजेचे आहे.
डेंजर लाईन ही वेगवेगळ्या किनार्यावर वेगवेगळ्या प्रकारे आहे. एकाच किनार्यावर काही भागात धोका असतो तर काही भाग सुरक्षित असतो. जिथे सुरक्षित भाग असतो तिथे तसे दर्शवणारे फलक उभारणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पर्यटन व्यवसायिकांशी संवाद साधून काही उपाययोजना कराव्या लागतील. कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटकांची संख्या आता वाढते आहे. यापुढे एकही दुर्घटना घडू नये यासाठी सरकारी यंत्रणेने स्वत:हून पुढाकार घ्यावा. त्यासाठी पर्यटन व्यवसायिक पुढे येतील. जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात यावेत आणि इथल्या निसर्गाचा, समुद्रकिनार्यांचा, गडकिल्ल्यांचा, वॉटर स्पोर्टस्चा आनंद लुटावा, यासाठी पर्यटन व्यवसायिकसुद्धा शासनाला सर्वतोपरी मदत करायला तयार आहेत. पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी म्हटले आहे.