कणकवली : शुक्रवारी रात्री 10.40 वा.च्या सुमारास कणकवलीतील पटवर्धन चौकात भरधाव वेगाने येणार्या कारने दुचाकीला मागाहून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील पती, पत्नीसह चिमुकला जखमी झाला आहे. जखमी तिघांवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघात प्रकरणी कार चालक राजमल मेघावाल (रा.उदयपूर, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील हरकुळ बुद्रूक देऊळवाडी येथील विजय विष्णू घाडीगावकर (वय 36) हे आपली पत्नी वीणा (वय 30) आणि दोन वर्षाचा विहांश यांच्यासह कणकवलीतील एका बँकेतील एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. रात्री 10.30 पैसे भरणा झाल्यानंतर ते महामार्गावरील सर्विस रोडने आपल्या घरी दुचाकीने जात होते.
रात्री 10.40 च्या दरम्यान कणकवली पटवर्धन चौकातील हॉटेल लोकप्रिय येथे त्यांच्या दुचाकीला मागून येणार्या कारची जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील विजय, त्यांची पत्नी वीणा, मुलगा विहांश हे रस्त्याकडेला कोसळले. यात वीणा हिच्या डोक्याला मार बसल्याने ती गंभीर जखमी झाली. तर विजय आणि विहांश यांनाही मुका मार बसला. तर तिघा जखमींना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केलेे. यात वीणा घाडीगावकर यांच्या डोक्याला मार बसून मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताची खबर विजय घाडीगावकर यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार हयगयीने आणि रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे लक्ष न देता भरधाव वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.
अपघातानंतर कार चालक तेथे न थांबता पटवर्धन चौकातून गाडी वळवून मुंबईच्या दिशेने पळाला. मात्र त्याच भागातील पुजारी इलेक्ट्रॉनिक्स समोर स्थानिकांनी त्याला अडवून चोप दिला.