District Voting News | प्रचाराच्या तोफा आज थंडावनार Pudhari Photo
सिंधुदुर्ग

District Voting News | प्रचाराच्या तोफा आज थंडावनार

जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व एका नगरपंचायतीसाठी उद्या मतदान

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या नगरपालिका आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार सोमवार, 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता संपणार आहे, तर मंगळवार, 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारी या चारही न. प. साठी सर्वच पक्षीयांनी प्रचाराचा धुरळा उडवला. शिंदे शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडीत सभा घेत प्रचार शिगेला पोहोचवला; तर पालकमंत्री नितेश राणे, आ.नीलेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आ. दीपक केसरकर यांनीही आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी कॉर्नर सभा, खळा बैठका घेत वातावरणनिर्मिती केली. यामुळे रविवार हा प्रचारांचा ‘सुपर संडे’ ठरला.

दरम्यान, जिल्ह्यातील चार नगराध्यक्ष पदांसाठी 18 उमेदवार रिंगणात असून, 77 नगरसेवकपदासाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात कणकवलीत भाजप विरुद्ध शहर विकास आघाडीमध्ये दुरंगी तर मालवणात भाजप आणि दोन्ही शिवसेना तिरंगी तसेच सावंतवाडी आणि वेंगुर्लेमध्ये भाजप, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होत आहे. नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा सोमवार हा अंतिम दिवस आहे.

मालवणमध्ये शिवसेनेचे आ. नीलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी केलेले पैशांचे स्टिंग ऑपरेशन, कणकवलीत ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेनेची झालेली युती, मालवण नगराध्यक्ष उमेदवाराच्या जातीचा मुद्दा, सावंतवाडी व वेंगुर्ले नगराध्यक्षपदावरून भाजप व शिवसेनेने एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप, काँग्रेसची ‘एकला चलो’ भूमिका, आ. नीलेश राणेंवर दाखल झालेला गुन्हा, त्यावरून राणे बंधूंमध्ये रंगलेले शाब्दिक द्वंद्व, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यावर आ. नीलेश राणे यांनी केलेले थेट आरोप, अशा अनेक कारणांनी जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले.

नराध्यक्षपदांसाठी लक्षवेधी लढती

जिल्ह्यातील चारही न. प. नगराध्यक्षपदांसाठी सर्वच पक्षांनी तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. यामुळे या चारही लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. यामध्ये कणकवली नगराध्यक्ष निवडणूक सर्वाधिक उत्कंठेची ठरली आहे. या ठिकाणी भाजपकडून समीर नलावडे विरूध्द उबाठा व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडीच उमेदवार संदेश पारकर यांच्यात थेट लढत होत आहे.

तर सावंतवाडीत भाजपतर्फे राजघराण्याच्या स्नुषा युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले, ठाकरे शिवसेनेतर्फे माजी आ. जयनंद मठकर यांच्या स्नुषा सीमा मठकर, शिंदे शिवसेनेतर्फे अ‍ॅड. नीता सावंत- कविटकर तर काँग्रेसतर्फे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी हे चार उमेदवार नगराध्यक्ष रिंगणात आहेत.

वेंगुर्लेमध्येही भाजपचे राजन गिरप, शिंदे शिवसेनेचे नागेश गावडे, काँग्रेसचे विलास गावडे आणि ठाकरे शिवसेनेचे संदेश निकम हे तुल्यबळ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी भवितव्य अजमावत आहेत.

मालवणमध्ये ठाकरे शिवसेनेच्या पूजा करलकर, भाजपच्या शिल्पा खोत आणि शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर या तीन दिग्गज महिला उमेदवारांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे या लढतींमध्ये आता कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सोमवार हा एक दिवस प्रचाराला मिळणार असून रात्री 10 वा. प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

या प्रचार कालावधीत स्थानिक नेते, आमदार यांच्या बरोबरच उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, ठाकरे शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, ठाकरे शिवसेनेचे आ. महेश सावंत, माजी आ. वैभव नाईक आदींनी प्रचार सभा घेत मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT