निकीता सावंत (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Bride Death Motorcycle Accident | मामाला लग्नाचे निमंत्रण देऊन परतणार्‍या नियोजित वधूचा मृत्यू

कसवण-तळवडे येथे दुचाकी घसरून झाला अपघात; विवाहापूर्वीच काळाचा घाला,फोंडा घाट परिसरावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पोखरण (ता. कुडाळ) येथे आपल्या मामाला लग्नाची आमंत्रण पत्रिका देऊन भावासोबत मोटारसायकलने घरी परतत असताना मोटारसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात निकीता दिलीप सावंत (28, रा. फोंडाघाट- गांगोवाडी) ही रस्त्यावर पडली. त्याच दरम्यान आंब्रडकडे जाणार्‍या एसटीच्या मागील चाकाला तिच्या कंबरेचा भाग घासला. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. आंब्रड - कसवण तळवडे मार्गावर रविवारी सायंकाळी 5.45 वा. च्या सुमारास हा अपघात झाला.

जखमी झालेल्या निकीता हिच्यावर आंब्रड येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तिला अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

येत्या फेब्रुवारी महिन्यात निकीता हिचे लग्न होते. मात्र, मामाला लग्नपत्रिका देऊन घरी परतत असताना काळाने तिच्यावर घाला घातल्याने सावंत कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निकीता ही मुंबईला बँकेत कामाला होती. तिचे लग्न ठरल्याने ती दोन दिवसापूर्वी फोंडाघाट येथे गावी आली होती. रविवारी सकाळी ती भाऊ वैभव याच्यासोबत दुचाकीने कुडाळ तालुक्यातील पोखरण गावी आपल्या मामाला लग्नाची आमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेली होती. मामाला आमंत्रण पत्रिका देऊन पुन्हा घरी परतण्यासाठी सायंकाळी हे भाऊ-बहीण पोखरण येथून आंब्रड-कसवण-तळवडे मार्गे कणकवलीला येत होते. सायंकाळी 5.45 वा. च्या सुमारास तळवडे-बौध्दवाडी येथील उतारावर ते आले रस्त्याच्या कडेला पडलेल्या खडीवर त्यांची मोटरसायकल स्लिप झाली. यामुळे मोटरसायकलवर मागे बसलेली निकीता रस्त्यावर पडली तर भाऊ वैभव हा दुचाकीसह दुसर्‍या बाजूला पडला. रस्त्यावर आदळल्याने निकीताच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मोठी जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याच दरम्यान कणकवली आगाराची आंब्रडकडे जाणारी एसटी बस येत होती. बस चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर ( रा. कणकवली) यांनी बसच्या आरशात निकीता पडलेली पाहताच त्यांनी तात्काळ ब्रेक लावला. मात्र बसच्या मागील चाकाला निकीता कंबरेच्या बाजूकडून घासली गेली.

एसटी बस चालक कृष्णा नेरकर यांनी त्याच बसमधून जखमी निकीता आणि वैभव यांना उपचारासाठी आंब्रड येथील दवाखान्यात नेले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रूग्णालयात आणि तेथून उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान निकीता हिचा मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद बस चालक कृष्णा नेरकर यांनी दिली. या प्रकरणी वैभव सावंत याच्यावर मोटरसायकल रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे भरधाव वेगात चालवून बहिण निकीता हिच्या गंभीर दुखापतीस व मृत्यू कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवलीच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. निकीता हिच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT