माडखोल येथे टेम्पोच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी झाला. File photo
सिंधुदुर्ग

माडखोल येथे टेम्पोच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा : माडखोल- धवडकी येथे भरधाव टेम्पोची धडक बसून श्रेयस काशीराम जाधव ( वय १४, रा. देवसू जाधववाडी) हा मुलगा गंभीर जखमी झाला. गुरुवारी स. ९ वा. च्या सुमारास हा अपघात झाला. जखमी श्रेयसवर गोवा- बांबोळी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघात प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक देवराज विठ्ठल धुळपन्नावार (रा. बेळगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला.

देवसू- जाधववाडी येथील श्रेयस इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे. गुरूवारी सकाळी तो एलीमेंटरी परीक्षेसाठी सांगेली नवोदय विद्यालयात जाण्यासाठी पारपोली सावंतवाडी एसटीमधून निघाला होता. या एसटीतून तो धवडकी स्टॉपवर उतरला असता त्याचवेळी आंबोली ते सावंतवाडी जाणाऱ्या अशोक लेलँड टेम्पोची धडक त्याला बसली. यामुळे तो रस्त्यावर पडला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला.

अपघातानंतर श्रेयस याच्या कानातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्याला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणीत त्याच्या डोक्यालादेखील गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर ग्रामस्थांनी टेम्पो चालकाला तिथेच रोखून धरत त्याला चोप दिला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. हयगयीने व अविचाराने वाहन चालवून मुलाच्या अपघातास व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक देवराज धुळपन्नावार यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT