मालवण : समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यात वाहून गेलेल्या होडीला किनार्‍यावर घेताना मच्छीमार बांधव. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Boat Damaged In Waves | लाटांच्या तडाख्यात नौका फुटली; जाळी फाटली

भरतीच्या पाण्यात रापणसह होडी वाहून गेली; आठ लाखाची हानी : ऐन हंगामात 40 मच्छीमार कुटुंबीय अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

उदय बापर्डेकर

मालवण : मच्छीमारांनी समुद्राच्या भरतीपूर्वी मासेमारी करून रापणसह होडी किनार्‍यावर नांगरून ठेवलेली असताना अचानक भरतीच्या पाण्यात होडी वाहून गेल्याने होडीचे नुकसान झाले. होडी पूर्णपणे दुभंगली गेली अन् होडीतील जाळीही समुद्रात वाहून गेली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. यामध्ये रामचंद्र मणचेकर रापण संघाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाला माहिती देण्यात आलेली आहे.

होडी आणि जाळी वाचविण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी आणि रापण संघाच्या सभासदांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र समुद्राच्या भरतीच्या पाण्याच्या ताकदीपुढे मच्छीमारांचा टिकाव लागू शकला नाही. यामुळे ऐन मच्छीमार हंगाम सुरू झालेला असताना मच्छीमारांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या रोजीरोटीची होडी नुकसानग्रस्त बनली होती.

रामचंद्र मणचेकर रापण संघामध्ये 40 मच्छीमार कुटुंबियांचा समावेश आहे. मासेमारी हंगाम सुरू झाल्याने रापण संघाची होडी किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात येते. सकाळच्या सत्रात भरती होण्यापूर्वी रापण समुद्रात जाऊन मारली जाते, आणि त्यांनतर मच्छिमार ती रापण जोडून किनार्‍यावर जातात. बुधवारी सकाळीही रापण समुद्रात टाकण्यात आली होती, त्यानंतर किनार्‍यावर ओढून आणण्यात आल्यानंतर पुन्हा रापण होडीत भरून किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आली होती. काही मच्छिमार पुन्हा संध्याकाळी रापण भरायची असल्याने ते आराम करण्यासाठी घरी गेले होते.

समुद्राला अचानक भरतीचे पाणी वाढले

सकाळी सुरू झालेल्या भरतीचे पाणी अचानक वाढल्याने काही क्षणातच किनार्‍यावरून रापण भरलेली होडी समुद्रात ओढली गेली. किनार्‍यावर असलेल्या काही स्थानिक मच्छीमारांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी मदतीसाठी इतर मच्छीमारांना बोलावले. समुद्रात वाहून जात असलेल्या होडीला दोरखंड बांधून ती किनार्‍यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. यानंतर मदतीसाठी सर्वांना बोलाविण्यासाठी श्रीकृष्ण मंदिरातील घंटा वाजविण्यात आली, त्यानंतर मच्छीमार मोठ्या संख्येने किनार्‍यावर जमा झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत होडी वाहून जाण्यापासून रोखून परत होडी किनार्‍यावर आणली. होडीचे दोन तुकडे झाले.

समुद्राच्या अजस्त्र लाटांच्या मार्‍याने होडी दोन भागात विभागली गेली. होडीच्या फळ्या समुद्रात पाहून गेल्या होत्या. होडीतीत रापणीचे जाळेही मोठ्या प्रमाणात समुद्रात वाहून गेले होते.

शर्थीचे प्रयत्न केल्याानंतर काही जाळी किनार्‍यावर आणण्यात यश आले होते, या दुर्घटनेमुळे रापण संघाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन हंगामाच्या सुरुवातीच मोठा अपघात झाल्याने संपूर्ण हंगामात करायचे काय असा प्रश्न पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT