मालवण : नारळी पौर्णिम निमित्त मालवण मधील भाजपच्या कार्यक्रमात व्यासपीठावर शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आ. नीलेश राणे यांनी उपस्थिती दर्शवत शिवसेना -भाजपा नात तुटू देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप व शिंदे शिवसेना यांच्यातील वाद मिटल्याचे दिसून आले. यावेळी भाजपा व शिवसेना दोन्ही गटाचे प्रमुख पदाधिकारी विभाग व्यासपीठावर आले होते.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवून भाजपा शिंदे शिवसेना यांनी सत्ता काबीज केली. दरम्यान आ. नीलेश राणे यांनी शिवसेना संघटना कुडाळ विधानसभा मतदारसंघात वाढविण्याकडे अधिक लक्ष दिले. यानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला. यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यावर भाजपचे कार्यकर्ते फोडल्याचे थेट आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. सावंतवाडी मध्ये जिल्हा प्रमुख संजू परब यांनी सुद्धा भाजपवर टिका केली. तर भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी संजू परब यांच्या टीकेला उत्तर दिले. अश्या प्रकारे आरोप-प्रत्यारोपाचेे सत्र सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गात महायुतीतील वाद पेटण्याची शक्यता होती. या वादामुळे भाजपा व शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा वाद मिटणार की वाढणार? या बाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. मात्र आता. आ. नीलेश राणे यांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला.
मालवण बंदर जेटी येथे भाजपच्यावतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित रहात आ. राणे यांनी शिवसेना आणि भाजपचे नाते आम्ही तोडू देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. जशी आपली युती आहे ती युती, मैत्री कायम राहणार असल्याचे सांगत आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ सुद्धा आ. नीलेश राणे यांनी वाढवला.
या कार्यक्रमानिमित्त भाजपा व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर एकत्र आले होते. आरोप- प्रत्यारोप करणारे शिवसेना -भाजपाचे जिल्हाध्यक्ष तर आ. राणे यांच्या दोन्ही बाजूने बसले होते. आ.राणे म्हणाले,भाजपाच्या या स्पर्धेचे हे दुसरं वर्ष आहे. गेल्यावर्षी या स्पर्धेला भेट दिली होती, त्यावेळी मी आमदार नव्हतो. पण सर्वांच्या सहकार्याने मी आमदार झालो. त्यांनतरची ही पहिलीच नारळी पौर्णिमा आहे. मी व्यासपीठावर येत असताना सर्वजण आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते.या स्पर्धेला येण्यासाठी मला निमंत्रणाची गरज नाही, भाजपाची ही स्पर्धा जेवढी वर्षे सुरु राहिलं तोपर्यंत मी येत राहणार. असे सांगून आ. राणे यांनी भाजपा शिवसेना मधील वादावर पडदा टाकला. यावेळी आ. नीलेश राणे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नारळ देखील लढवले.