सिंधुदुर्गनगरी ः भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित प्रभाकर सावंत, रणजीत देसाई व इतर. pudhari photo
सिंधुदुर्ग

Mahayuti Party Expansion: महायुतीचा धर्म पाळत पक्ष वाढवा!

भाजपा जिल्हाध्यक्षांचा मित्र पक्ष शिंदे शिवसेनेला सल्ला; मंत्री उदय सामंतांचे ‘ते’ विधान क्लेशदायक

पुढारी वृत्तसेवा

Mahayuti alliance principles

ओरोस ः ‘आम्ही पक्ष वाढवतो म्हणून काहींच्या पोटात दुखते’ असे विधान महायुतीतील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. त्यांचा रोख हा भारतीय जनता पक्षाकडे असावा. मात्र त्यांचे हे विधान महायुतीसाठी क्लेशदायक आहे. कारण पक्ष वाढविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. महायुतीची ताकद वाढत असेल तर आम्हालाही आनंदच आहे. जिल्ह्यातील तीनही आमदार महायुतीचे असल्यामुळे मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र पक्ष मित्र पक्षाचे कार्यकर्ते घेऊन महायुतीची ताकद वाढणार नाही, याची जाणीव ना. सामंत यांनी ठेवावी.आम्ही ही ती ठेवली आहे. यामुळे महायुतीचा धर्म पाळून पक्ष वाढविण्यास कुणाची हरकत नसावी, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, मंडळ अध्यक्ष भाई सावंत, महिला नेत्या सुप्रिया वालावलकर आदी उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले, लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका भाजपाच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. सिंधुुदुर्ग हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कारण जिल्ह्यात भाजपाचे 1 लाख 70 हजार अधिकृत सभासद आहेत. भाजपला लोकसभेला 1 लाख 57 हजार तर विधानसभेला 2 लाख 71 हजार मतदान झाले होते. ही आकडेवारी पाहता सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध होते.

महायुतीचे या जिल्ह्यात तीन आमदार असून या तिन्ही आमदारांच्या विजयामध्ये भाजपासह महायुती मधील शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी या सर्वांचे योगदान आहे. येत्या काळात जि. प., पं. स. तसेच नगरपंचायत निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुतीची ताकद आणखी वाढत असेल तर आनंदच आहे, असेही प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.

देशात व राज्यात महायुतीची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा कारभार सुरू आहे.महायुतीतील घटक पक्षांमध्ये निधीचे वाटप, विविध समित्यांमधील नियुक्त्या याबाबत वरिष्ठ नेत्यांनी सर्व वाटप सूत्रे निश्चित केली आहेत. जिल्ह्यात भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, मंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. मागील काळातील भाजपची ताकद संघटनात्मक बळकटीमुळे आणखी वाढली आहे.

मात्र आमच्या सर्वच नेत्यांनी महायुतीतील मित्र पक्षांमधील कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश कटाक्षाने टाळले आहेत. अन्य विरोधी पक्षातील पक्षप्रवेश भाजपने केले असून पक्षाची ताकद वाढविली आहे. तशीच ताकद शिंदे शिवसेनेने वाढविली तर महायुतीमधील ताकद आणखी वाढेल व पुढील निवडणुकीत आणखी मोठे यश मिळवता येईल. असेही प्रभाकर सावंत म्हणाले.

‘ताटातील वाटीत व वाटीतील ताटात’

शिंदे शिवसेनेकडून होणार्‍या पक्ष प्रवेशांवर श्री. सावंत यांनी टीका केली. त्यांचे पक्ष प्रवेश म्हणजे ‘ताटातील वाटीत व वाटीतील ताटात’ असा काहीसा प्रकार आहे. शिवसेनेचे नेते असलेले राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी आपली पक्ष संघटना मजबूत केली तर नक्कीच महायुतीची ताकद वाढणारी आहे. त्याचा आम्हाला आनंदच होईल. हा आनंदा चिरकाल टिकावा असा प्रयत्न त्यांनी करायला हवा. भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेऊन महायुतीची ताकद वाढणार नाही,याबाबत त्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले.

प्रभाकर सावंत म्हणाले...

सिंधुदुर्ग हा भाजपाचाच बालेकिल्ला!

जिल्ह्यात भाजपचे 1 लाख 70 हजार सभासद

मित्र पक्ष फोडून महायुती मजबूत होणार नाही

आगामी निवडणुकांसाठी महायुतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील

शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवू असे म्हणत आहे, याबाबत पत्रकारानी विचारले असता प्रभाकर सावंत म्हणाले, याबाबत भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. महायुती म्हणून निवडणुकीचा निर्णय झाला तर महायुतीचा धर्म पाळून निवडणुका लढवू. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला तर ती भूमिका स्वीकारू. हा सर्व निर्णय वरिष्ठ नेतृत्वाचा आहे असे शेवटी प्रभाकर सावंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT