ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) कडून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध वैयक्तिक प्रलोभने तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासने देवून चुकीच्या कार्यपद्धतीने त्यांचा पक्ष प्रवेश घेत आहेत, अशी तक्रार भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू परब आणि इतर पदाधिकार्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्तेत असलेल्या महायुतीतील या दोन्ही पक्षांमध्ये भविष्यात वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे प्रकार तात्काळ थांबविण्याची मागणीही प्रभाकर सावंत यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. या पत्रात प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पक्षाचे संघटन अधिक मजबुत करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यातील तीन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपची ताकद मोठी असताना महायुतीच्या धोरणानुसार जिल्ह्यातील दोन मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत केली. मात्र निवडून आल्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ जिल्हा पदाधिकार्यांनी महायुतीमधील समन्वय व्यवस्थित राखून जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा योग्य तो आदर करणे अपेक्षित होते. परंतु कुडाळ- मालवण व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच वरिष्ठ पदाधिकारी हे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध वैयक्तिक प्रलोभने तसेच स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामांची आश्वासने देत चुकीच्या पध्दतीने त्यांचा पक्ष प्रवेश घेत आहेत. तसेच त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी संपर्क साधत आहेत.
प्रभाकर सावंत यांनी पत्रात म्हटले आहे की, यापुर्वी अनेकदा अश्या प्रकाराबाबत संबंधित पदाधिकार्यांना महायुतीतील आचारसंहितेविषयी वरिष्ठांमार्फत योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही जबाबदार पदाधिकारी पुन्हा पुन्हा अशा प्रकारचे वर्तन करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी महायुती मधील सहयोगी पक्ष यांच्याबरोबर समन्वय आणि संवाद गरजेचा आहे, अश्यावेळी स्थानिक पातळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विविध प्रलोभने दाखवून स्वतःच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर महायुती मधील सेना व भाजपा या पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे, आणि त्याचा फायदा निश्चितच विरोधी पक्षाला होणार आहे याकडेही प्रभाकर सावंत यांनी लक्ष वेधले आहे.
त्यांच्यापेक्षा दुप्पटीने आम्ही त्यांच्याकडे आता असलेल्या कार्यकत्यांचे प्रवेश घेऊ शकतो, कार्यकर्ते तयार आहेत. परंतु निवडणूक समोर असताना आमच्या वरिष्ठांची अडचण होता नये, आपला पक्ष मोठा आहे, आमच्याकडून युतीचा धर्म मोडता नये यासाठी आम्ही गप्प आहोत. सेनेच्या या धोरणामुळे आमच्या प्रत्येक मंडल आणि जिल्हा बैठकीत स्वबळाचा आग्रह कार्यकर्ते पोटतिडकीने मांडतात. त्यांना आवरणे सुद्धा दिवसेंदिवस कठीण होत आहे. यासाठी हा विषय अधिक गांभीर्याने विचारात घ्यावा आणि प्रदेशाध्यक्ष व आपण आपल्या स्तरावरून या विषयाची गंभीरतेने दखल घेवून संबंधित सेना पदाधिकारी यांना त्यांच्या पक्ष प्रमुख वरिष्ठांमार्फत योग्य त्या सूचना द्याव्यात,अशी मागणी केली आहे.