सावंतवाडी : रविवारची सुट्टी... काही कामानिमित्त बाहेर पडलेला तरुण... पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. चराठा-नमसवाडी येथे दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात परशुराम प्रकाश पोखरे (वय 32, रा. कारिवडे-डंगवाडी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उपचारासाठी त्याला गोवा-बांबोळी येथे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. या काळजाचा ठोका चुकवणार्या घटनेने कारिवडे गावावर शोककळा पसरली आहे. परशुराम हा म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारची सुट्टी असल्याने तो काही कामासाठी चराठा येथे आला होता.
तेथून चिकन घेऊन घरी परतत असताना दुपारी बाराच्या सुमारास चराठे-ओटवणे रस्त्यावरील नमसवाडीच्या चढावर त्याच्या नशिबी काळाने घाला घातला. ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर हा अपघात घडला.
या भीषण अपघाताचा थरार हृदय पिळवटून टाकणारा होता. नमसवाडीतील चढावर परशुरामचा दुचाकीवरील ताबा अचानक सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली.वेगात असलेली दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी भिंतीवर (गडग्यावर) जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, परशुराम गाडीवरून हवेत उडून रस्त्यावर आदळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव सुरू झाला. अपघाताचा आवाज ऐकून आणि माहिती मिळताच चराठ्यातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या अपघाताची माहिती शेजार्यांनी पोलिसांना दिली असून, सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एका तरुण आणि कर्तबगार मुलाच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.