दुकानवाड : लक्ष्मी पूजनाच्या मंगलदिनी वसोली ग्रामपंचायतीने समाजकल्याणाचा सुंदर उपक्रम राबवत एकाच दिवशी तब्बल 24 घरकुलांचे भूमिपूजन करून घरकूल योजनेतील शिल्लक घरे पूर्णत्वास नेण्याची ऐतिहासिक सुरुवात केली.
वसोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वसोली, उपवडे, आंजिवडे आणि साकिरडे ही गावे येतात. शासनाच्या घरकूल योजनेतून ग्रा. पं. ला एकूण 61 घरे मंजूर झाली आहेत. त्यापैकी बहुतेक लाभार्थ्यांनी गतवर्षीच बांधकामास सुरुवात करून काहींनी घरे पूर्णही केली होती. मात्र 24 लाभार्थींचे घरकूल काम प्रलंबित होते. मुख्यत्वे सरपंच अजित परब, उपसरपंच सदानंद गवस, विस्तार अधिकारी कृषी संदेश परब आणि ग्रामपंचायत अधिकारी अतुल कदम यांनी या लाभार्थ्यांना एकत्र करून घर बांधकामास प्रवृत्त केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा एकत्रित भूमिपूजन सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीने 15 डिसेंबरपर्यंत सर्व घरे बांधून पूर्ण करण्याचे ध्येय ठरवले आहे. लाभार्थ्यांनीही या कालमर्यादेत घर पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. या सामूहिक उपक्रमामुळे वसोली ग्रामपंचायतीने केवळ विकासाच्या दिशेने पाऊल उचलले नाही, तर ‘गाव एकसंध तर विकास सुलभ’ हा संदेशही दिला आहे. गावकर्यांसह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाचे कौतुक होत असून, वसोली ग्रामपंचायत ‘आदर्श ग्रामपंचायत’ म्हणून पुढे येत आहे.