Sindhudurg news : ‘ओंकार’च्या बंदोबस्तासाठी उद्यापासून आंदोलन
मडुरा : कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये ओंकार हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती आणि बागायती धोक्यात आली आहे. या हत्तीचा त्वरित बंदोबस्त न केल्यास 21 ऑक्टोबरपासून शेतातच बसून आंदोलन करण्याचा इशारा तीनही गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
स्थानिक ग्रामस्थ तसेच मडूरा, कास व सातोसे सरपंचांनी सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक यांना शुक्रवारी निवेदन सादर केले. यात म्हटले आहे, ओंकार हत्ती 27 सप्टेंबरपासून कास, मडुरा आणि सातोसे गावांच्या परिसरात फिरत आहे. या हत्तीने भातशेती तसेच नारळ, पोफळी आणि केळीच्या बागायतींचे मोठे नुकसान केले आहे. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच हत्तीचा उपद्रव वाढल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे.
वनविभागाचे फसवे आश्वासन
वनविभागाने कास माऊली मंदिरात दोन दिवसांत हत्तीचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हत्ती पकडण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देऊन शेतकर्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. मात्र दोन आठवडे उलटूनही हत्ती पकड मोहिमेबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. वनरक्षक केवळ फटाके फोडण्याचे काम वनविभाग करत असल्याचा आरोपही शेतकर्यांनी केला आहे.

