वैभववाडी : शनिवारी मध्यरात्री भुईबावडा बाजारपेठ शांत झोपेत असताना, सूर्यवंशी कुटुंबाच्या घरात मात्र धुराचे आणि धोक्याचे लोट शिरले. घराशेजारीच असलेल्या त्यांच्या ‘धर्मराज बेकरी’ला लागलेल्या भीषण आगीने क्षणात होत्याचे नव्हते केले. या दुर्घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे आग आटोक्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. प्रसाद सूर्यवंशी हे नेहमीप्रमाणे बेकरी बंद करून बाजूच्या घरात झोपायला गेले होते. मात्र, मध्यरात्री घरात धूर पसरल्याने आणि श्वास गुदमरू लागल्याने संपूर्ण कुटुंबाला जाग आली. बाहेर येऊन पाहताच त्यांना धक्का बसला; त्यांची बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.
सूर्यवंशी यांनी आरडाओरड करताच शेजारी मदतीला धावले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीत बेकरीतील महागडा फ्रिज, फर्निचर, कच्चा माल आणि इतर सर्व विद्युत उपकरणे जळून खाक झाली. ग्रामस्थांनी तातडीने वीजपुरवठा खंडित करून शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली. त्यांच्या या धाडसामुळे आग शेजारील दुकानात आणि घरात पसरण्यापासून रोखली गेली. घटनेची माहिती मिळताच सरपंच बाजीराव मोरे, तलाठी दीपक म्हस्के, पोलिसपाटील मनोज चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
स्थानिकांच्या मते, परिसरात विजेचा दाब सतत कमी-जास्त होत असल्याने उपकरणे जळण्याचे प्रकार वारंवार घडतात. याच कारणामुळे शॉर्टसर्किट होऊन ही दुर्दैवी घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.