बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात छुप्या पद्धतीने बेकायदेशीररित्या गोवा दारू वाहतूक करणार्या दोन तरुणांना बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 1 लाख 45 हजार 680 रू. ची गोवा दारू आणि 5 लाखाची कार असा एकूण 6 लाख 45 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री 11.40 वा. च्या सुमारास बांदा -देऊळवाडी येथे करण्यात आली.
गोवा दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची पक्की खबर बांदा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील, ज्ञानेश्वर हळदे, राजाराम कापसे यांनी सापळा रचला. दरम्यान पत्रादेवी येथून बांदा -देऊळवाडी येथे येणार्या मारुती सुझुकी बॅलेनो कारला या पथकाने अडवले असता आतील दोन्ही तरुणांनी गाडी टाकून पळण्याच्या प्रयत्न केला. मात्र कॉन्स्टेबल प्रसाद पाटील व हळदे यांनी शिताफीने त्यांना पकडले. गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये रॉयल इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्कीच्या प्रत्येकी 750 मि.ली. मापाच्या 852 बाटल्या (किंमत 1 लाख 19 हजार 280 रू.) आणि इम्पिरियल ब्ल्यू हँड पिक ग्रेन व्हिस्कीच्या प्रत्येकी 2 लिटर मापाच्या 30 बाटल्या (किंमत अंदाजे 26 हजार 400 रू.) असा मुद्देमाल आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी सुजल सचिन पवार (21, रा. तेर्सेबांबर्डे, गवसवाडी, ता. कुडाळ) आणि सुमित विकास कुडाळकर (19, रा. पिंगुळी म्हापसेकर तिठा) या दोन तरुणांना ताब्यात घेतले. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पाच लाख रुपयांची चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक गंजेंद्र पालवे, पोलिस सहायक निरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिसांनी केली असून अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.