Kudal Artist draw realistic pictures of animals on stones
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
कलाकाराची नजर सामान्यांपेक्षा वेगळी असते, ती निसर्गातील साध्या गोष्टींमध्येही सौंदर्य, कल्पकता आणि प्राण शोधते. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील तेंडोली-खरावतेवाडी येथील श्रेयस मेघःश्याम सर्वेकर या (२२ वर्षीय) युवकाने अशाच एक अनोख्या दृष्टिकोनातून निर्जीव दगडांमध्ये सजीव प्राण्यांची रुपं निर्माण केली आहेत. दगडांमध्ये प्राण्यांची सजीवता निर्माण करणा-या तरुण कलाकार श्रेयसच्या या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तेंडोली तळेवाडी येथील डॉ. सीमा तेंडोलकर यांच्या मालकीच्या श्री ओम गजानन आमराई या ठिकाणी श्रेयसने विविध दगडांवर प्राण्यांची हुबेहूब चित्रे रेखाटली आहेत. हत्ती, वाघ, सिंह, हरिण, गवारेडा, सांबर, ससा, खार, कुत्रा, सरडा, अजगर अशा अनेक प्राण्यांचे त्याने दगडांच्या नैसर्गिक आकारांनुसार चित्रण केले आहे. या चित्रांमध्ये असलेला सजीवपणा पाहून तेथे फिरायला येणारे पर्यटक थक्क होतात आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढल्याशिवाय राहत नाहीत.
या कामात त्याला अक्षय कृष्णा साटम आणि अमर अजित राऊळ यांची मोलाची साथ लाभली आहे. श्रेयस लहानपणापासूनच चित्रकलेत प्रवीण असून, शाळेत असतानाच त्याचे चित्रकलेवरील प्रेम दिसून येत होते. त्याच्या चित्रांमध्ये केवळ सौंदर्य नव्हे, तर संवेदना आणि जिवंतपणाही ठळकपणे दिसतो. दगडांवरील चित्रांसोबतच त्याने भिंतींवर वारली चित्रशैलीत पेंटिंग्ज साकारली आहेत. याशिवाय त्याने दशावतारातील विष्णूचे दहा अवतार मत्स्य, कुर्मा, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की यांचे भित्तिचित्रणही केले आहे, जे पाहणाऱ्याला आध्यात्मिक समाधान देते.
श्रेयसचे प्राथमिक शिक्षण तेंडोली शाळा क्र. 1 मध्ये, तर माध्यमिक शिक्षण परशुराम नाईक मास्तर हायस्कूलमध्ये झाले. 2022 साली त्याने वेतोरे येथील कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. सध्या तो रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख (ता. संगमेश्वर) येथील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनमध्ये 'बॅचलर ऑफ फाईन आर्टस् (पेंटिंग)' या शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
कोरोना काळात त्याने आपल्या चित्रकलेला अधिक वेळ देण्यास सुरुवात केली. त्याच्या कलाकृतींचे व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाले असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याने यापूर्वी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, धर्मवीर आनंद दिघे यांचे स्टोन पेंटिंग्सही साकारली आहेत. श्रेयसचे वडील मेघश्याम सर्वेकर हे देखील चित्रकार, मूर्तीकार आणि वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली)चे मालक आहेत. दशावतारातील अनेक भूमिका ते साकारतात.
वडिलांच्या कलाविश्वातूनच प्रेरणा घेत श्रेयसने ही कला आत्मसात केली असून, दशावतारात लहान भूमिका सादर करणे, पखवाज वादन, गणपती मूर्ती बनवणे आणि विविध प्रकारची चित्रे तयार करणे या सर्व कला त्याच्यात खोल रुजलेल्या आहेत. श्रेयस सर्वेकर याच्या कलेतून केवळ सौंदर्य किंवा रंगांची उधळण नाही, तर त्यामागे असलेली निसर्गाशी असलेली नाळ, कल्पकतेचा उत्कट आविष्कार आणि मेहनतीची जिद्द आहे. त्याच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळाले, तर हा युवक राज्यस्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडेल, यात शंका नाही. पुढे जाऊन आपल्या कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचं, असं त्याचं स्वप्न आहे.
श्रेयसची कलाकृती पाहिल्यावर “कलाकाराची नजर ती वेगळीच असते” हे वाक्य आज खरं ठरतंय. सामान्य माणसाला जे दगड वाटतात, त्यात श्रेयसला सजीव रूप दिसते. निसर्गात सहजपणे आढळणाऱ्या दगडांचे निरीक्षण करताना त्याला त्यांच्यात विविध प्राणी-पक्ष्यांचे आकृतीबंध दिसतात. याच कल्पनेला मूर्त स्वरूप देत त्याने दगडांवर रंगांची मदत घेऊन हत्ती, वाघ, सिंह, हरिण, गवारेडा, सांबर, ससा, खार, कुत्रा, सरडा, अजगर अशा विविध प्राण्यांची जिवंत चित्रे रेखाटली आहेत. निर्जीव दगडांमध्ये प्राण्यांचे आकार शोधून त्यावर हुबेहूब चित्रे साकारणारा श्रेयस, आपल्या अनोख्या कल्पकतेने आणि कौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.