

चिपळूण : सावर्डेतील राधा-गोविंद फाऊंडेशनच्यावतीने कोकणातील होतकरू, बेरोजगार तरूण-तरूणींना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेगा जॉब अॅप्लीकेशन’ची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने हा अॅप तयार करण्यात आला असून लवकरच हा अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. त्या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते या अभिनव अॅपचे अनावरण नुकतेच सावर्डे येथे करण्यात आले. येत्या काही दिवसांत हा अॅप चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील बेरोजगार तरूण-तरूणींसाठी उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या टप्प्यात तो सर्वांसाठीच खुला होईल. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील तरूण-तरूणींना या माध्यमातून ‘नोकरी आपल्या दारी’ ही संकल्पना सत्यात येणार आहे. फक्त एका क्लिकवर विविध क्षेत्रातील नोकर्या मिळवून देण्याची सुविधा व संधी या अॅपच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे. या अॅपमध्ये विविध स्थानिक, राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश असणार आहे. त्या माध्यमातून स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हा अॅप हाताळण्यासाठी सहज व सुलभ असून मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे. या अॅपवर रजिस्ट्रेशन करून मुलांनी आपला बायोडाटा अपलोड करायचा आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमर्याद रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. त्या माध्यमातून संबंधित कंपनी आपल्याला हवा तो उमेदवार निवडतील आणि संबंधित उमेदवारांना संपर्क केला जाईल आणि मुलाखतीचे निमंत्रण पाठविले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगार संधी यामध्ये उपलब्ध होणार आहेत.
इंजिनिअरिंग, आय.टी., मेडीकल, बांधकाम, नर्सिंग, सेल्स, बँकिंग, केमिकल, फूड अॅण्ड ड्रग्ज अशा सर्वच प्रकारच्या कंपन्या व आस्थापना या अॅपच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहेत. ‘आर. जी. मेगा जॉब’ असे या अॅपचे नाव असून लवकरच तो कार्यान्वित होणार आहे आणि त्या माध्यमातून स्थानिक मुलांना नोकरीची संधी मिळणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्थानिक बेरोजगारांना नामी संधी उपलब्ध झाली आहे.
आ. शेखर निकम यांनी ‘आर. जी. अॅप’साठी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या कल्पनेतून हा अॅप निर्माण करण्यात आला आहे. स्थानिक बेरोजगार तरूण-तरूणींना नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत? तेथे अर्ज कसा करायचा? जॉब कसा मिळवायचा? याचे मार्गदर्शन मिळत नाही. ते काम हा अॅप करणार आहे. त्यामुळे स्थानिक मुलांना हा अॅप महत्त्वपूर्ण असून पहिल्या टप्प्यात चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील तरूणांना हा अॅप रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल. पुढील टप्प्यात तो सार्वत्रिक केला जाईल, असे आ. शेखर निकम यांनी सांगितले.