तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना आरोंदा येथील मच्छीमार ग्रामस्थ व उबाठा शिवसेनेचे रूपेश राऊळ, मायकल डिसोजा पदाधिकारी. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Local Fishermen Protest | आरोंदा येथील जमीन फेरफार प्रकरणाच्या सुनावणी अधिकार्‍यावर अविश्वास!

स्थानिक मच्छीमार व ठाकरे शिवसेना पदाधिकार्‍यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे जमिनीवर घरे आणि मालकी असतानाही परस्पर विक्री झाल्याचे भासवून मच्छीमारांना बेघर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, या प्रकरणी सुनावणी करणारे माजगावचे महसूल मंडळ अधिकारी कैलास गावडे यांच्या कार्यपद्धतीवर आमचा विश्वास नाही. यामुळे सदर अपिलीय सुनावणी त्यांच्याकडून काढून घ्यावी, अशी मागणी आरोंदा गावातील स्थानिक मच्छीमार आणि ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

आरोंदा येथील फेरफार क्रमांक 2507 ची अपिलीय सुनावणी सध्याचे मंडळ अधिकारी कैलास गावडे यांच्याकडून निष्पक्षपातीपणे होणार नाही, सबब ही अपिलीय सुनावणी अन्य अधिकार्‍याकडे वर्ग करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, आरोंदा येथील फेरफार क्रमांक 2507 ची सुनावणी आजगाव मंडळ अधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. सध्या या मंडळावर कैलास गावडे कार्यरत आहेत. 21 जुलै रोजी ही सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, मंडळ अधिकारी श्री. गावडे यांच्या वर्तनावरून त्यांनी फेरफारातील वर्दी देणार्‍या कंपनीशी हातमिळवणी केल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला. त्यांच्याकडे यासंदर्भात खात्रीलायक पुरावे असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, कैलास गावडे हे त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता सदर कंपनीच्या बाजूने निर्णय देतील, असे त्यांच्या वर्तनावरून दिसून येत आहे. यामुळे मच्छीमार आणि शेतकर्‍यांच्या न्याय हक्कांचे नुकसान होणार असून, त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीपासून, घरादारापासून आणि शेती तसेच मच्छीमारी व्यवसायापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यासाठी फेरफार क्रमांक 2507 चे कामकाज कैलास गावडे यांच्याकडून काढून घेऊन, ते अन्य कोणत्याही सक्षम मंडळ अधिकारी किंवा महसूल अधिकार्‍याकडे वर्ग करण्याची मागणी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे करण्यात आली.ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांच्या उपस्थितीत मच्छीमार गोकुळदास मोठे, रघुवीर पेडणेकर, अनंत चांदेकर, रामदास पेडणेकर, बलवंत शिवलकर, प्रथमेश नवघरे, भरत कोरगावकर, हरिचंद्र कोरगावकर, सुरेश सारंग आणि अन्य मच्छीमार बांधवांनी हे निवेदन दिले. तहसीलदारांनी या प्रकरणी योग्य ती कारवाईचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT