सिंधुदुर्ग

विधान परिषदेत अनिकेत तटकरेंचा मार्ग सुकर

राजकीय विशेष-शिवसेनेचे बंड शमणार; प्रमुख नेत्यांमध्ये झाली चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : नितीन सावंत

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा कोकण विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर शिवसेना शिंदे गटाच्या जुईली दळवी जुवेकर यांनी बंडखोरी केली आहे. मात्र, महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक होत महायुतीचाधर्म घटक पक्षांनी पाळा, अश्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या, त्यामुळे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे तर शिवसेनेकडून करण्यात आलेले बंड शमणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

महायुतीमध्ये कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जात अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सोमवारी अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकण विधान परिषद मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची सर्वाधिक मते असल्याने या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. अलिबागचे आ. महेंद्र दळवी यांच्याकन्या जुईली दळवी जुवेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

यादरम्यान राज्यातील सर्व जागांचे महायुतीकडून जागा वाटप जाहीर होत त्यात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आली. राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनिकेत तटकरे यांचे नाव जाहीर करण्यात आले, मात्र शिवसेनेच्या बंडखोरीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष होते. मात्र शिंदे यांनी सर्वांनी महायुतीचा धर्म पाळण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यातच शिवसेना नेते मंत्री उदय सामंत, ना. भरत गोगावले, महेंद्र थोरवे अशा कोकणातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर बंडखोरी न करण्याचे ठरवण्यात आले.

त्याचबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आदी प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होत कोकण विधान परिषदेची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या महायुती धर्म पाहण्यासंदर्भातील सूचना आ. महेंद्र दळवी यांना देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. त्यामुळे आता जुईली दळवी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात सर्व १७ जागांमध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. महायुतीमध्ये बंडखोरी प्रमाण जास्त असल्याने या बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी आणि त्यांची मन धरणीसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. नुकतीच सुनील तटकरे यांनी रायगड शासकीय विश्रामगृह येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याचे समजते.

या भेटीमध्ये कोकणातील जागे बरोबरच महाराष्ट्रातील इतर जागांमध्ये महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरी संदर्भात चर्चा करण्यात आली. मित्र पक्षांमधील बंडखोरीचा फटका महायुतीला बसू शकतो याविषयी सुद्धा चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे येत्या दोन दिवसात बंडखोरांची समजूत घालत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा मार्ग सुकर करण्याचेही ठरविण्यात आले. कोकणातील या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे शिवसेनेतील बंडखोरी क्षमविण्यात नेतृत्वाला यश आल्यानंतर अनिकेत तटकरे यांना ही निवडणूक अधिक सोपी जाणार आहे.

सिंधुदुर्गमध्ये २२३ मतदार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ५० सदस्य व सर्व आठ तालुका पंचायत समित्यांचे सभापती तसेच सावंतवाडी वेंगुर्ले मालवण कुडाळ दोडामार्ग कणकवली आधी नगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायतींचे १६५ नगरसेवक आहेत. एकूण मतदारसंघांमध्ये सिंधुदुर्गातील मते सुद्धा निर्णायक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT