सावंतवाडी : शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले आ. दीपक केसरकर यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या, माजी उपनगराध्यक्षा अनारोजीन लोबो यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली. सावंतवाडी येथे आ. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्या दौर्यावर असताना त्यांनी आ. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अचानक शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख नीता कविटकर यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अनारोजीन लोबो यांनी माईक घेऊन आपली भूमिका मांडली.
त्या म्हणाल्या, दीपक केसरकर हे अत्यंत प्रामाणिक आहेत आणि त्यांनी शिवसेनेसोबत एकनिष्ठता कायम ठेवली आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना योग्य सन्मान देऊन मंत्रिमंडळात स्थान दिले जावे, अशी मागणी केली. हे बोलताना लोबो गहिवरल्या. आमचे भाई साधे आहेत, ते काही मागणार नाहीत, असे सांगत त्यांनी केसरकर यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी केली.
लोबो यांच्या या थेट मागणी ऐकून पत्रकार परिषदेत उपस्थित आ. केसरकर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसले. ही मागणी करण्याची योग्य जागा नाही, असे त्यांनी लोबोंना सांगितले. मात्र, लोबो यांची तळमळ पाहून गृहराज्यमंत्री कदम यांनी त्यांना प्रतिसाद दिला. या विषयावर आपण नंतर आढावा बैठकीत बोलू, असे आश्वासन ना.कदम यांनी दिले. ते म्हणाले, शिवसेना मुख्य नेते,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक व ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर हे आहेत. त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य सन्मान करणार असून यापेक्षाही मोठे पद त्यांना मिळेल असा विश्वास ना. कदम यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी नगरसेविका भारती मोरे, शर्वरी धारगळकर दिपाली सावंत, दिनेश गावडे, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई, सरपंच योगेश तेली. ना. दीपक भाई केसरकर मित्रमंडळाचे आबा केसरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.