आंबोली टायगर टोड (Male) (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Amboli Tiger Toad | आंबोलीच्या जैवविविधतेची ओळख ‘टायगर टोड’!

प्रदेशनिष्ठ प्रजात असल्याने ‘आंबोली टोड’ नावानेही ओळख

पुढारी वृत्तसेवा

निर्णय राऊत

आंबोली : पश्चिम घाटातील जैवविविधतेचा मुख्य हॉट स्पॉट असलेल्या आंबोली परिसरात ‘उडत्या बेडका’ प्रमाणेच ‘आंबोली टोड’ अर्थात ‘टायगर टोड’ या नावाने ओळखला जाणारा बेडूक सापडतो. प्रदेशनिष्ठ म्हणजे पश्चिम घाट क्षेत्रात केवळ आंबोलीच्या जंगलातच हा वैशिष्ट्यपूर्ण बेडूक आढळून येतो. आंबोलीच्या जैवविविधेतेचे हे एक वैशिष्ट्य आहे.

जगात फक्त आंबोली परिसरात आढळणार्‍या या ‘आंबोली टोड’चे पूर्वीचे शास्त्रीय नाव होते ‘झँथोफ्रीन टायग्रीना’ (दरपींहेहिीूपश ींळसशीळपर)असे होते. आता हल्लीच ते बदलून ‘बेडुका आंबोली’ (इशर्वीज्ञर रालेश्रळ) असे करण्यात आले आहे. या नावातूनच या बेडूक प्रजातीची प्रदेशनिष्ठता मान्य करण्यात आली आहे. शरीराची कोरडी, जाड चामड्यासारखी त्वचा आणि कानाजवळ असलेल्या विषग्रंथी या त्याला ओळखण्याच्या मुख्य खुणा आहेत.‘आंबोली टोड’ या नावावरूनच लक्षात येईल की ही प्रजाती संपूर्ण जगभरात फक्त आणि फक्त आंबोली परिसरात आढळते. कोयना अभयारण्य परिसरात आढळणारा ‘कोयना टोड’ हा या बेडकांचा भाऊबंद आहे, जो जगात फक्त कोयना धरण परिसरातच आढळतो.

‘आंबोली किंवा टायगर टोड’ या बेडकाचे शरीर पिवळ्या, काळ्या आणि मातकट रंगाचे असते आणि त्यावर काळे डाग किंवा पट्टे असतात. पावसाळ्यात प्रजनन काळात याच्या नराचा पिवळा रंग अगदी जाणवण्याइतपत ठळक होतो. पोटाच्या बाजूला, दोन पायांच्या मध्ये काळ्या रंगाचे मोठे पट्ट्यांसारखे दिसणारे काळे डाग असतात, जे पिवळ्या रंगावर अगदी उठून दिसतात. त्यामुळे यांचे शरीर पट्टेरी वाघासारखे दिसते, म्हणून याला इंग्रजीत ‘टायगर टोड’ असे म्हणतात.

हा बेडूक प्रामुख्याने निशाचर आहे. रात्रीच्या वेळी तो आपल्या चिकट जिभेचा वापर करून कीटक आणि किड्यांसारख्या लहान अपृष्ठवंशी प्राण्यांची शिकार करतो. दिवसा हा बेडूक कातळ सड्यांवरील खडकात त्याच्या रंगामुळे अगदी बेमालूमपणे एकरूप होऊन लपून बसतो. सभोवतालच्या वातावरणात एकरूप होऊन लपून राहण्याच्या या प्रकाराला ‘कॅमोफ्लॉज’ असे म्हणतात.

वैशिष्ट्यपूर्ण ‘स्फोटक प्रजनन’

नर बेडूक मादीपेक्षा लहान असतात. प्रजनन या काळात नर कर्कश आवाज करतात. मादीसाठी ते इतर नरांशी लढतात व कमजोर नरांना हाकलून लावतात. ही वर्चस्वाची लढाई बरेचदा खूप वेळ चालते. जिंकलेला नर मादीबरोबर मिलन करतो. मादी सड्यांवरील खडकात साचलेल्या पाण्याच्या तात्पुरत्या डबक्यात एकावेळी सुमारे 30-35 अंडी घालते. अंड्यातून टॅडपोल म्हणजे डिंभ बाहेर येतात व त्यापासून नवीन बेडूक तयार होतात.

अभ्यासा दरम्यान या प्रजातीच्या बेडकांत नवीन वर्तन आढळले, ज्याला ‘स्फोटक प्रजनन’ म्हटले जाते. सड्यांवरील खडकांवर साचलेल्या पाण्याची डबकी खूप लहान असतात. त्यामुळे त्यात अतिशय कमी, मर्यादित संसाधने किंवा पोषणमूल्ये असतात. शिवाय पडणार्‍या पावसात जर खंड पडला, पावसाने विश्रांती घेतली, तर खडकांतील साचलेली डबकी सुकायला लागतात. या स्थितीत खडकांतील अंडी किंवा डिंभ नष्ट व्हायचा धोका असतो. हा धोका कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आणि जन्मदर टिकवण्यासाठी मादी एकापेक्षा अनेक खडकात किंवा वेगवेगळ्या डबक्यात अंडी देतात. या अंड्यातून बाहेर आलेले डिंभ जलद रूपांतरित होतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी अंड्यांचे समूह असल्याने, संपूर्ण अंडी एकत्रच नष्ट व्हायचा धोका कमी होतो, आणि संख्या सांभाळण्यात मदत होते.

वन्यजीव पर्यटकांची आंबोलीला भेट

दरम्यान,‘आंबोली टोड’ ही प्रजाती संपूर्ण जगभरात फक्त आणि फक्त भारतातील पश्चिम घाटातील आंबोली परिसरात आढळते. यामुळेच या अद्भुत बेडकाला पाहण्यासाठी अभ्यास, संशोधन व फोटोग्राफी करिता पावसाळ्यात जून ते ऑगस्ट-सप्टेंबर या काळात हजारो वन्यजीव व निसर्गप्रेमी आंबोलीला भेट देतात! त्यामुळे पर्यटन व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

बेडकाच्या अस्तित्वाला विविध धोके

या बेडकांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो. सगळ्यात मोठे, मुख्य धोके म्हणजे, जंगलतोड, रस्ते, शेती यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे अधिवास नष्ट होणे आणि अनियंत्रित पर्यटन. ज्या भागात ही प्रजाती आढळते त्या भागात वनक्षेत्राचे नुकसान होत आहे. शेतीसाठी, बांधकामांसाठी किंवा इतरही काही कारणांसाठी त्यांचा आढळ असणार्‍या सड्यांवर आक्रमण होत आहे. बर्‍याच वेळेला पावसाळ्यात हे बेडूक सड्यांजवळून जाणार्‍या रस्त्यांवर, गाड्यांखाली येऊन चिरडलेले आढळून आले आहेत. अजून एक प्रमुख धोका म्हणजे मोठ्या प्रमाणात होत असलेले अनियंत्रित पर्यटन. अनेक वेळेला पर्यटक अगदी यांचा अधिवास असलेल्या सड्यांवर जाऊन गाड्या फिरवतात, वेगवेगळा कचरा करतात. गाड्यांमुळे चिरडले जाणे, तर कचरा करण्यामुळे त्यांच्या प्रजनन चक्रात अडथळे येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT