आंबोली : आंबोली-गावठणवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळा नं. 6 कार्यरत असणारे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (वय 36) यांनी त्यांच्या राहत्या घरी (रा. गेळे, ता. सावंतवाडी) खोलीत गळफास घेत जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी घडली असून, शनिवारी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर आनंद कदम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘टीईटी’ परीक्षेत यश येत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी ही आत्महत्या केल्याचे त्यांच्या ‘सुसाईड नोट’मधून उघड झाले.
आनंद कदम हे शुक्रवारी (दि. 10) सकाळी नेहमीप्रमाणे आंबोली- गावठणवाडी शाळेत कार्यरत होते. मात्र, दुपारनंतर तब्येतीचे कारण सांगून सुट्टी घेऊन ते घरी गेळे येथे गेले. संध्याकाळी त्यांचा मोठा भाऊ घरी परतला, त्यावेळी आनंद कदम यांनी त्यांच्या खोलीत गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे हवालदार संतोष गलोले आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.
शनिवारी कदम यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. जी. बी. सारंग आणि डॉ. महेश जाधव यांनी केले. श्री. कदम यांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. ज्यात कदम यांनी मी ‘टीईटी’ परीक्षा पास होऊ शकत नाही, असा उल्लेख करून आत्महत्येचे कारण नमूद केले आहे, अशी माहिती मिळत असून घटनेच्यावेळी आनंद कदम यांचे आई-वडील पुणे येथे होते तर त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा गडहिंग्लज येथे राहत होते. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. आनंद कदम हे मनमिळाऊ स्वभावाचे आणि शिक्षणप्रेमी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि शिक्षण सेवावृत्तीमुळे त्यांची परिसरात चांगली प्रतिमा होती. त्यांच्या निधनाने आंबोली आणि गेळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिक्षक वर्ग, राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.