Amboli Ghat Tourist Clash
सावंतवाडी : आंबोली येथील पर्यटकांची वाढती गर्दी आणि त्यातून उद्भवणारी वाहतूक कोंडी पुन्हा वादाचे कारण ठरली आहे. आंबोली घाटात साईड देण्यावरून सुरु झालेला किरकोळ वाद सावंतवाडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि त्याचे रुपांतर हातघाई वझटापटीत झाले. या घटनेत एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला दुखापत झाली असून, उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मंगळवारी बांदा येथील पाच पर्यटक आंबोली येथे पर्यटनासाठी गेले होते. आंबोली घाट उतरत असताना त्यांनी गोव्यातील दुचाकीस्वारांना बाजू देेण्यास सांगितले. यावरून वाद सुरू झाला. गोव्यातील सुमारे 10 ते 15 तरुण आंबोली पर्यटन स्थळावर एकत्र आले होते. त्यांनी बांदा येथील या पर्यटकांच्या कारचा पाठलाग केला. दाणोली पोलीस नाक्यावर कार थांबताच, गोव्यातील तरुणांनी एकत्र येऊन हेल्मेट कारवर मारत दादागिरी केली. त्यानंतरही त्यांचा पाठलाग सुरूच होता. सावंतवाडी बस स्थानकासमोरील बांधकाम विभागाच्या वळणावर त्यांनी कारसमोर दुचाकी लावून कार अडविण्याचा प्रयत्न केला.
याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आबा पिळणकर आणि सुनील नाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही गोव्यातील तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांदा येथील कार चालकही तेथे पोहोचले होते. या दरम्यान गोव्यातील तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन एक्स-रे काढण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, शरद लोहकरे, अमित राऊळ, आबा पिळणकर, सुनील नाईक आणि अन्य पोलिसांनी गोव्यातील तरुणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.