निर्णय राऊत
आंबोली : जागतिक जैवविविधतेचे आकर्षण केंद्र असलेल्या पश्चिम घाटात वसलेले महाराष्ट्रातील आंबोली हे त्याच्या विविध उभयचर प्राण्यांसाठी खास असे प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये अनेक प्रजातींच्या सिसिलियनचा म्हणजे मराठीत ज्याला देवगांडूळ म्हणतात, त्यांचाही महत्त्वाचा समावेश आहे. सिसिलियन हे पाय नसलेले, माती उकरणारे उभयचर प्राणी आहेत. ते वर्षाचा जास्तीत जास्त काळ जमिनीखाली लपून राहतात आणि पावसाळ्यात फक्त पृष्ठभागावर आढळतात. आंबोली हे देवगांडुळांचे सुरक्षित घर मानले जात आहे. त्यामुळे जीवशास्त्राचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांसाठी आंबोली हे आकर्षण ठरले आहे.
सिसिलियन म्हणजेच देवगांडूळचे शरीर हे लांबलचक आणि गुळगुळीत असते आणि त्यांची त्वचा पातळ असते. लहान सिसिलियन वरवर पाहता गांडुळांसारखे दिसतात तर मोठे बहुतेकदा साप समजले जातात. तथापि, डोळे, दात आणि सांगाडा यांच्या उपस्थितीमुळे ते गांडुळांपासून वेगळे आहेत आणि त्वचेवर खवले नसल्यामुळे सापांपासून वेगळे आहेत.
पश्चिम घाटातील आंबोली हे गेजेनोफिस डॅनिएली, गेजेनोफिस गोएन्सिस, गेजेनोफिस परेशी आणि इचथ्योफिस डेव्हिडी सारख्या अनेक कमी ज्ञात देवगांडूळांच्या प्रजातींचे सुरक्षित असे घर आहे. त्यांचे पर्यावरणीय महत्त्व मोठे असूनही, या अवयवहीन उभयचरांना आययूसीएन रेड लिस्टमध्ये डेटा डेफिशिएंट म्हणून वर्गीकृत केले आहे, म्हणजेच त्यांच्या पर्यावरणशास्त्र, वितरण, अधिवास आणि त्यांना असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल म्हणावी तशी माहिती नाहीये.
सिसिलियन हे नाव लॅटिन शब्द ‘सेकस’ पासून आले आहे, ज्याचा शब्दशः अर्थ ‘आंधळा’ असा आहे. सिसिलियन हे सर्वात कमी परिचित उभयचर आहेत. हे सामान्यतः मांसाहारी असतात. यांचे शरीर गडद रंगाचे असते. आणि कवटी मजबूत बांधणीची असते. सिसिलियनचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे नाकपुड्यांमधील केमोसेन्सरी स्पर्शिका.
सुमारे 75 टक्के सिसिलियन हे व्हिव्हिपेरस असतात, मराठीत ज्याला जरायूज म्हणतात, म्हणजेच ते आधीच विकसित झालेल्या पिल्लांना जन्म देतात. गर्भाला मादीच्या शरीराच्या आत अंडाशयाच्या आतील पेशींद्वारे पोसले जाते, जे त्या विशेष दातांनी खातात. तर काही सिसिलियन अंडी घालतात आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात.
दरम्यान, पुणे येथील वन्यजीव तज्ज्ञ आदित्य नानिवडेकर सांगतात, सिसिलियन या विषयात 100 वर्षांहून अधिक काळ संशोधन होऊनही, पश्चिम घाटातील मान्यताप्राप्त सिसिलियन प्रजातींची संख्या अजूनही वाढत आहे. गेल्या काही वर्षात उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातून पाच नवीन प्रजातींचे वर्णन करण्यात आले आहे. त्यांच्या जीवशास्त्राबद्दल आपल्याला जवळजवळ काहीही माहिती नाही आणि त्या सर्वांमध्ये त्यांच्या संवर्धन स्थितीबद्दल माहितीची कमतरता आहे. भारतातील काही प्रदेशांच्या लोककथांमध्ये, सिसिलियन ह्या प्राण्यामुळे लोकांना घाबरवले जाते आणि त्यांची निंदा केली जाते, ज्याला काही शास्त्रीय आधार नाही. याचे कारण त्याचे सापासारखे दिसणे आणि त्यांच्याबद्दल काही माहिती नसणे.
आंबोली परिसर हा निरनिराळ्या सदाहरित जंगलांमध्ये ग्रामीण वस्त्यांचे मिश्रण आहे आणि अनेक स्थानिक, प्रदेशनिष्ठ आणि धोक्यात आलेल्या सिसिलियन, उभयचर आणि सरीसृप प्राण्यांचे घर आहे. तथापि, मोठ्या प्रमाणात पर्यटन आणि रिअल इस्टेट विकासामुळे जमिनीच्या वापरातील जलद बदल या नाजूक परिसंस्थेला धोका निर्माण करत आहेत. आंबोलीत रस्ते विकासामुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार काही शिफारसी सुचवल्या आहेत, ज्या अंमलात आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत आदित्य नानिवडेकर यांनी व्यक्त केले आहे.