कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्य. शाळांमधून लवकरच ‘एआय’ प्रणाली राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी दिली. शिक्षण क्षेत्रात होणार्या या बदलांना सामोरे जाण्यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी स्वतःला अपडेट करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभाग व जिंल्हा माध्य.व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या विद्यमाने कुडाळ येथील मराठा संस्थान सभागृहात सहविचार सभा पार पडली. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, उपाध्यक्ष हनुमंत वाळके, आर. टी. सावंत, कार्यवाह रामचंद्र घावरे, सहकार्यवाह प्रशांत ठाकूर, आयव्यय निरीक्षक जे .के.ठाकूर, विद्या समिती अध्यक्ष रत्नाकर सरवणकर, सचिव राजेंद्र राठोड, कार्यकारणी सदस्य शरद चोडणकर, अजित परब, प्रवीण घाडीगांवकर, नितीन गावडे, नंदकिशोर म्हापसेकर, प्रमोद कांबळे, हिराचंद तानावडे, संजय राठोड, माजी कार्यवाह गुरूदास कुजगांवकर, योजना विभाग शिक्षणाधिकारी निलीमा नाईक, कार्यालयीन कर्मचारी, 10 वी 12 वी प्रथम तीन क्रमांक विद्यार्थी पालक उपस्थित होते. यावेळी 10 वी 12 वी परीक्षेत जिल्हात प्रथम तीन क्रमांक विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
कविता शिंपी म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्य. शाळांमधून ‘एआय’ शिक्षण प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या निर्णयाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. या बदलाला सामोेरे जाण्यासाठी सर्व प्रथम माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी तयार असणे महत्वाचे आहे. सिंधुदुर्ग हा वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे. जिल्ह्यात विविध माध्यमिक शाळा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतात, गेली 14 वर्षे जिल्हा 10 वी, 12 वी परीक्षेत कोकण बोर्डात प्रथम क्रमांक घेत आहे. हरित जिल्हा होण्यासाठी 60 हजार झाडे लावून जगवायची आहेत. त्यासाठी प्रत्यक विद्यालयाने ‘एक पेड माँ के नाम’ योजना प्रभावीपणे राबवावी असे आवाहन केले.
योजना विभाग मार्फत निलीमा नाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी असणार्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच युडायस बाबत शत्रुघ्न चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन बाबत समिती संघटक विजय चौकेकर, पायाभूत चाचणी बाबत संदीप पवार, विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी विषय गुणवत्ता वाढ बाबत श्री.कांबळे , राजेंद्र देसाई, श्री.लाडगावकर, श्री. अत्तार, स्काऊट गाईड विषयी समादेशक अंजली माहूरे, साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील जीवनविद्या मिशनचे संदीप परब, वाहतूक सुरक्षा बाबर सोन्सुरकर, अति. पोलिस अधीक्षक नयोनी साटम आदींनी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग कन्या नयोनी साटम यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत वामन तर्फे यांनी केले तर आभार रामचंद्र घावरे यांनी मानले.