ताडपत्री टाकून भात झोडताना शेतकरी. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Agricultural Mechanization | कृषी यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक ‌‘शेतखळे‌’ कालबाह्य!

ह्यो पावस... कधी आंधारान येयत सांगाक येवचो नाय.. तेवा...खळाबिळा करुच्या भानगडीत पडाया नको सरळ ताडपत्री पसरवन... बाकडो ठेवन...भात झोडुक घेवया.

पुढारी वृत्तसेवा

आडेली :‌ ‘ह्यो पावस... कधी आंधारान येयत सांगाक येवचो नाय.. तेवा...खळाबिळा करुच्या भानगडीत पडाया नको सरळ ताडपत्री पसरवन... बाकडो ठेवन...भात झोडुक घेवया. पावस इलोच तर त्याच ताडपत्रेन भात झाकुक गावताला... ‌’ असे संभाषण सध्या सर्वत्र शेतकरी वर्गातून ऐकू येत आहे. परतीच्या पावसाने शेतातील पीक ओलेच असल्याने शेतखळे न करता ताडपत्री व प्लास्टिक कापडाचा आधार घेत शेतातच भाताची झोडणी करताना शेतकरी दिसत आहे. तर काळाच्या ओघात विविध यांत्रिकीकरणामुळे ‌‘शेतखळे‌’च कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी शेतातील पीक एकत्र करून ठेवण्याची जागा म्हणजे ‌‘शेतखळे‌’. याच शेतखळ्यावर भाताची, कणसांची झोडणी, मळणी, भात सुकवणे, भाताला वारं देणे, गवत साळवून ठेवणे अशी विविध शेतकामुांसाठी या शेतखळ्याचा वापर होत असे. शेतखळे तयार करण्यासाठी जमीन खणणे, पेटणे( चोपणे) दोन ते तीन वेळा शेण-मातीने सारवल्यानंतर शेतखळे तयार होत असे. मात्र यासाठी अपार मेहनत लागते व वेळ वाया जातो, तर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यास सर्व मेहनत पाण्यात जात असल्याने ‌‘शेतखळे‌’ बनविण्याऐवजी ताडपत्री व प्लास्टिक कापडाचा आधार घेत शेतातच भाताची झोडणी करताना शेतकरी दिसून येत आहेत.

पारंपरिक‌‘मळणी‌’ पद्धतही कालबाह्य

शेतखळ्याच्या मध्यभागी एक भक्कम लाकूड किंवा लोखंडी पाईप रोवला जात असे. त्या खांबाला दोन-चार बैल बांधून गोलाकार फिरवले जायचे. यालाच शेतकऱ्यांचे पारंपरिक मळणी यंत्र असे म्हटले जात असे. मात्र काळाच्या ओघात यांत्रिकीकरणामुळे व बैलांच्या कमी झालेल्या संख्येमुळे ही पारंपरिक मळणी पद्धतही कालबाह्य झाली असून शेतात आता मळणी यंत्रे धडधडताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT