मळगाव : वेळागर समुद्रकिनारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील अंतर्गत वातावरण प्रतिकूल असल्यामुळे रविवारी वेंगुर्ले तालुक्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमार वातावरणाचा अंदाज घेऊन किनारपट्टी भागात मासेमारी करत सावधगिरी बाळगत आहेत. दरम्यान, समुद्रात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर तातडीने किनार्यावर जाण्याच्या दृष्टिकोनातून मच्छीमार सतर्क राहून खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.
समुद्राच्या अंतर्गत गतिमान प्रवाहामुळे वेळागर किनारपट्टीवर घडलेली दुर्घटना डोळ्यासमोर ठेवून मच्छीमारांनी मासेमारी करताना सतर्कता बाळगली आहे. अरबी समुद्रातील वातावरण वरून शांत वाटत असले तरी अंतर्गत प्रवाह गतिमान असल्यामुळे प्रतिकूल आहे. गेले दोन दिवस प्रतिकूल वातावरणाचा अंदाज घेत मच्छीमार केवळ किनारपट्टी भागातच मासेमारी करून परत वेंगुर्ले बंदर मांडवी खाडीत आपल्या मच्छीमारी नौका सुरक्षित परतवत आहेत.
प्रादेशिक हवामान विभागाच्या हवामान संदेशानुसार हवामान विभागाने राज्याच्या किनार्या लगत मच्छीमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याचा इशारा दिलेला आहे. 4 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत 45 ते 55 किमी. प्रति तास वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग 65 किमी.पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तरी यांत्रिक, यंत्रचलित नौकांनी, तसेच बिगर यांत्रिकी नौकांनी देखील या कालावधीत खाडी क्षेत्रात अथवा समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीस जाऊ नये.
वादळी वार्यासह पावसाचे हवामान योग्य होईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. त्यामुळे रविवारी समुद्री वातावरणाचा अंदाज घेत किनारपट्टीवर केवळ किनारी भागातच मच्छीमारांनी मच्छीमारी करून मच्छीमारी नौका परत खाडीपात्रात आणल्या.