आचरा : वीज अधिकार्‍यांसमोर समस्या मांडताना आचरा ग्रामस्थ. (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | आचरा ग्रामस्थांचा वीज अभियंत्यांना घेराव

सुमारे पाच तास कार्यालयातच मांडला ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

आचरा : गेले काही दिवस कोसळणार्‍या वादळी पावसामुळे आचरे पंचक्रोशीतील वीज पुरवठा अनियमित बनला आहे. मात्र वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने संतप्त आचरावासीयांनी सोमवारी सकाळी सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत आचरा येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली व उपकार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. ग्रामस्थांनी वीज कार्यालयातच ठिय्या मांडला. अखेर आचरा वीज कार्यालयासाठी लाईनमन व सहा. अभियंता दोन दिवसात उपलब्ध करून देण्याची ग्वाही अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले सुमारे पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासनानुसार कर्मचारी उपलब्ध न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनीही अधीक्षक अभियंता यांना फोनवरून धरेवर धरले. आचरासारख्या मोठ्या गावात तारा तुटून घरावर पडल्या तरी वीज अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाही. वीजेचा शॉक लागून म्हैस मरुन तीन दिवस झाले तरी वीज कर्मचारी पोहोचत नाहीत. गरीब शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे, तुमच्याकडे माणुसकी शिल्लक आहे की नाही? अश्या शब्दात श्री. सामंत यांनी अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारला.

आचरा बाजारपेठत दुकानाच्या शेडवर पडली विद्युत वाहिनी

रविवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील व्यापारी अभिजीत सावंत यांच्या दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर चालू विद्युत वाहिनी तुटून पडली होती. यावेळी विद्युत प्रवाह सुरू राहिल्याने धोका निर्माण झाला होता. यासाठी वीज कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होवू शकले नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत येथील महावितरण कार्यालयात धडक दिली.

उपसरपंच संतोष मिराशी, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, मंदार सांबारी, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, ग्रा. पं. सदस्य मुझफ्फर मुजावर, चंद्रकांत कदम, महेंद्र घाडी, राजन पांगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

वीज कार्यालयात ग्रामस्थ दाखल झाले तरी तासभर होवूनही जबाबदार अधिकारीच नसल्याने सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी उपकार्यकारी अभियंता श्री. लिमकर यांच्याशी संपर्क साधला. जो पर्यंत आपण आचरा वीज कार्यालयात उपस्थित होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हालणार नसल्याचे सांगितले. दरम्यान काही वेळाने कार्यालयात आलेल सहा. अभियंता ओम शिंदे यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले.

तुम्ही आमच्या प्रश्नांची जबाबदारी घेऊन उत्तर देणार काय, अन्यथा वरिष्ठांना बोलवा असे त्यांना सुनावले.अखेर काही वेळाने उपकार्यकारी अभियंता श्री. लिमकर हजर झाले. त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT